Nashik Teachers’ Constituency : विभागातील ६९ हजार शिक्षक निवडणार आमदार

Nashik Teachers’ Constituency : विभागातील ६९ हजार शिक्षक निवडणार आमदार

Nashik Teachers' Constituency : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागातील ६९ हजार शिक्षक आमदार निवडणार आहे. या शिक्षक निवडणूकीत नाशिक, नगरची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान घेण्यात येणार आहे. विभागातील ६९ हजार ३६८ शिक्षक मतदार त्यांचा लोकप्रतिनिधी विधान परिषदेत पाठविणार आहेत. विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक २५ हजार ३०२ शिक्षक मतदार आहेत.

  • नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागामध्ये मतदार नोंदणीत नाशिक जिल्हा अव्वल स्थानी आहे.
  • महायुती तसेच महाविकास आघाडीने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
  • विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण ९० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत ही तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने मतदारसंघासाठीची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुरवणी यादीत चार हजार ५६४ मतदार वाढले आहेत. त्यामुळे अंतिम मतदारसंख्या ६९ हजार ३६८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ४६ हजार ५०३ पुरुष, तर २२ हजार ८६५ महिला मतदार आहेत. विभागामध्ये मतदार नोंदणीत नाशिक जिल्हा अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल नगरमध्ये १७ हजार ३९२ मतदारांची नोंदणी झाली आहे. जळगावला १३ हजार १२२ मतदार आहेत. धुळे व नंदुरबारमध्ये अनुक्रमे ८ हजार १५९ व ५ हजार ३९३ शिक्षकांनी मतदारयादीत नावनोंदणी केली आहे.

महायुती तसेच महाविकास आघाडीने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र, महायुतीला बंडखोरीने ग्रासले आहे. निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचा सहा दिवसांचा कालावधी आहे. शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याने निवडणूक रंगतदार हाेणार यात शंका नाही. परंतु, सरतेशेवटी नाशिक व नगरमधील शिक्षक मतदार कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात कौल टाकतात, यावर निकालाचे सारे गणित अवलंबून असणार आहे.

९० मतदान केंद्रे

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण ९० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये 29 केंद्रे आहेत. नगर व जळगावला प्रत्येकी २०, तर धुळे व नंदुरबारला अनुक्रमे १२ व ९ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

मतदारसंघ निहाय मतदार

जिल्हा                   मतदार
नाशिक                  25,302
नगर                      17,392
जळगाव                 13,122
धुळे                         8,159
नंदुरबार                   5,393
एकूण                    69,368

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news