राजगडमध्ये एकजुटीचा करिष्मा; सुप्रिया सुळे यांना निर्णायक आघाडी

राजगडमध्ये एकजुटीचा करिष्मा; सुप्रिया सुळे यांना निर्णायक आघाडी

[author title="दत्तात्रय नलावडे" image="http://"][/author]

वेल्हे : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेतील सर्वांत कमी मतदान असलेल्या राजगड (वेल्हे) तालुक्यात महाविकास आघाडीच्या एकजुटीने निकालात करिष्मा पाहवयास मिळाला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत राजगडकरांनी सुप्रिया सुळे यांना अधिक मताधिक्य दिले नसले तरी काही गावांचा अपवाद वगळता बहुतेक गावांत सुळे यांना आघाडी आहे.

आ. संग्राम थोपते ह्यांच्या कष्टाचे फळ

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत वर वर प्रचार न करता आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचारात गुंतवले. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांनी जोमाने प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, तालुकाध्यक्ष किरण राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, संचालिका निर्मला जागडे आदींसह मनसेचा मोठा फौजफाटा पवार यांच्या प्रचारात उतरला होता.

महायुतीने केली पैशाची उधळण

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत महायुतीने संपूर्ण राजगड (वेल्हे) तालुका पिंजून काढला. रायगड जिल्ह्यालगतच्या दुर्गम घोळ, पोळे, दापसरेपासून पानशेत, वेल्हे, निगडे मोसे, आंबवणेपर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले. मात्र, अनेक मतदारांना पैसे मिळाले नाहीत. पैशांच्या वाटपावरून पदाधिकार्‍यांत वाद झाल्याच्या चर्चा वार्‍यासारखा पसरल्या. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वेल्हे बुद्रुक येथे सुनेत्रा पवार यांना 264, तर सुप्रिया सुळे यांना 383 मते मिळाली. असेच चित्र काही गावांचा अपवाद वगळता बहुतेक गावांत आहे.

काँग्रेसची ताकद वाढली

आमदार संग्राम थोपटे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, तर गेल्या दोन दशकांपासून वेल्हे तालुका पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. प्रबळ विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे कुमवत झाला आहे, तर शिवसेना, भाजपची ताकद ठरावीक भागातच आहे. मनसेचे महायुतीसोबत गेल्याने मनसेचे कार्यकर्ते पक्षांतर करू लागले आहेत. अशीच स्थिती महायुतीतील इतर पक्षांची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या असल्या तरी काँग्रेसची ताकद
मात्र पहिल्यापेक्षा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित यांच्या नेतृत्वामुळे महायुती तालुक्याचा भरीव विकास करेल, असे सांगितले. मात्र विरोधी महाविकास आघाडीस सहानुभूतीच्या लाटेमुळे तालुक्यात मताधिक्य मिळाले नाही.

– भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ
(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शेतकरी, सर्वसामान्यांपर्यंत आघाडीची भूमिका पोहोचली. त्यामुळे आघाडीला चांगले यश मिळाले. असे असले तरी काही गावांत महायुतीला चांगले मतदान झाले आहे, तर अनेक गावांत महायुती व महाविकास आघाडीच्या मतांत थोडा फरक आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा तसेच जि. प. व पं. स. निवडणुकांवर होणार आहे.

– नानासाहेब राऊत, तालुकाध्यक्ष, राजगड (वेल्हे) काँग्रेस

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news