धंगेकरांना कसब्यात धक्का; विधानसभा निवडणुकीवरही होणार परिणाम

धंगेकरांना कसब्यात धक्का; विधानसभा निवडणुकीवरही होणार परिणाम

[author title="ज्ञानेश्वर बिजले" image="http://"][/author]

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातच विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पिछाडीवर राहावे लागल्याने त्यांना मोठा धक्का बसला. भाजपने मतदानाची टक्केवारी वाढवित त्यांचा पूर्वीचा बालेकिल्ला राखला. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत. कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 14 हजार 187 मतांची आघाडी घेतली.

धंगेकर या मतदारसंघातील प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्या प्रभागातही त्यांना या वेळी तीनशे मतांनी पिछाडीवर राहावे लागले. सदाशिव पेठ, नारायण पेठ या भागांतील प्रभागात भाजपने 17 हजार मतांची आघाडी घेत धंगेकरांना रोखले. त्यालगलच्या दत्तवाडी प्रभागात भाजपला सहाशे मतांची आघाडी मिळाली. शिवाजी रस्त्याच्या पूर्व बाजूच्या पेठांमध्ये धंगेकर यांनी आघाडी घेतली. गणेश पेठ, रास्ता पेठ या भागात धंगेकर यांनी सातशे मतांची, तर शुक्रवार पेठ, मोमीनपुरा, गुरुवार पेठ या भागातील प्रभागात दोन हजार मतांची आघाडी घेतली. लोहियानगर भागातही त्यांना नऊशे मतांची आघाडी मिळाली.

पूर्व भागातील पेठांमध्ये धंगेकरांनी पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती. तर, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ या पश्चिम भागातील पेठांमध्ये भाजपने मोठे मताधिक्य मिळवित मोहोळ यांना आघाडी मिळवून दिली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी गेले वर्षभर मतदारसंघाची बांधणी करण्यावर भर दिला होता. हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, अजय खेडेकर, कसबा पेठ मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी एक लाख 37 हजार मतदान झाले होते. यावेळी एक लाख 59 हजार मतदान झाले. सुमारे साठ टक्क्याच्या आसपास मतदान झाले. वाढलेले मतदान हे आम्ही नागरीकांशी संपर्क ठेवून करून घेतले, त्याचा फायदा झाला, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

कसबा पेठेत काँग्रेस आघाडी घेईल, अशी चर्चा मतदानापूर्वी होती. मात्र, भाजपने शिस्तबद्ध रित्या योजना आखत या मतदारसंघात पुन्हा आघाडी मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार गिरीश बापट यांना कसबा पेठ मतदारसंघात 51 हजार मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत यावेळी आघाडी कमी मिळाली असली, तरी येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. धंगेकर यांना आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा ताकदीने प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे. कसबा पेठ मतदारसंघातच धंगेकर यांना धक्का देण्यात भाजपचे कार्यकर्ते यशस्वी ठरले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news