वडगाव शेरीकरांची महायुतीलाच साथ; मोहोळ यांना 14 हजार 200 मताधिक्य

वडगाव शेरीकरांची महायुतीलाच साथ; मोहोळ यांना 14 हजार 200 मताधिक्य

[author title="पांडुरंग सांडभोर " image="http://"][/author]

पुणे : सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 14 हजार 200 मतांचे मताधिक्य देऊन महायुतीला साथ दिली. या मताधिक्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी हा सर्वाधिक चार लाख 67 हजार 669 इतके मतदान असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 51.71 टक्के म्हणजेच दोन लाख 41 हजार 817 इतके मतदान झाले होते. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असलेला हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात कोणाला मताधिक्य मिळणार, याकडे लक्ष लागले होते.

राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेना यांची मोठी यंत्रणा या मतदारसंघात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन दिवंगत खासदार गिरीश बापट यांना तब्बल 57 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे मोहोळ यांना या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे, भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे यांच्यासह राष्ट्रवादी, भाजपचे माजी नगरसेवकांची मोठी यंत्रणा मोहोळ यांच्या बाजूने होती. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा मानला जातो. त्यामुळे येरवडा, विश्रांतवाडी परिसर हा दलित आणि मुस्लिमबहुल असल्याने या मतदारसंघात कोणाला मताधिक्य मिळणार, याबाबत उत्सुकता होती. त्यात निवडणुकीदरम्यान महायुतीत एकवाक्यता नसल्याने त्याचा फटका बसेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. तर याउलट हा मतदारसंघ मोठे मताधिक्य देईल, अशी काँग्रेसची आशा होती.

मात्र, या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मोहोळ यांना आघाडी मिळाली, पहिल्याच फेरीत मोहोळ यांना 6 हजार 584 तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना चार हजार 301 मते मिळाली. त्यात मोहोळ यांना 2 हजार 283 मताधिक्य मिळाले.
दुसर्‍या फेरीत 2 हजार 662, त्यानंतर अपवाद काही फेर्‍या वगळता मोहोळ यांनाच मताधिक्य मिळाले. अपेक्षित मताधिक्य देता येऊ शकले नसले तरी किमान मताधिक्य मिळाल्याने महायुतीच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news