कुल, थोरात एकत्र असूनही सुनेत्रा पवार पिछाडीवरच; काय आहेत कारणं?

कुल, थोरात एकत्र असूनही सुनेत्रा पवार पिछाडीवरच; काय आहेत कारणं?

[author title="दीपक देशमुख" image="http://"][/author]

यवत : बारामती लोकसभेचा अंतिम निकाल हाती आल्यानंतर दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 24 हजार 267 मतांची आघाडी मिळाल्याचे दिसून आले. एकंदरीतच सुप्रिया सुळे यांच्या विजयात दौंडकरांनी देखील हातभार लावल्याचे या निकालावरून दिसले. दौंड तालुक्यातील प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपा आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे एकत्र येऊनही सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभेतून आघाडी मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे आणि भाजपकडून राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी दौंड विधानसभेतून कांचन कुल यांना सात हजार मतांची आघाडी मिळाली होती. तत्कालीन समयी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर असणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यावेळी अजित पवार गटाच्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबरोबर असूनही सुनेत्रा पवार यांना आघाडी घेण्यात अपयश
आले आहे

ओबीसी फॅक्टर अपयशी

दौंड तालुक्यातील लक्षणीय ओबीसी मतदार संख्येच्या जोरावर बहुजन समाज पार्टीकडून लोकसभा निवडणुकीत उभे असणारे दौंड तालुक्यातील उमेदवार महेश भागवत यांना तालुक्यातील ओबीसी समाजाची मते खेचून आणण्यात अपयश आल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

अपुरी यंत्रणा तरीही आघाडी

तालुक्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राहुल कुल आणि रमेश थोरात यांनी महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत सुप्रिया सुळे यांना एकाकी पाडले होते, तर सुळे यांना केवळ दोन ते तीन तालुका पातळीवरील नेत्यांना घेऊन प्रचार यंत्रणा राबवावी लागली. यात शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, नामदेव ताकवणे यांचा समावेश होता. तरीही सुप्रिया सुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदान खेचून आणण्यात यशस्वी ठरल्या.

शरद पवारांचा डाव यशस्वी

लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी दौंड विधानसभेत तीन वेळा जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावली. या सर्व वेळी शरद पवार यांनी तालुक्यातील विद्यमान आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यावर टीका करणे पूर्णपणे टाळले. शरद पवार यांनी जाहीरपणे कुल कुटुंबाचे कौतुक देखील केले. पवार यांनी दोन्ही गटांपैकी कोणतेही एका गटावर जाहीरपणे टीका केली असती तर तो गट आक्रमकपणे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करताना दिसला असता. परंतु शरद पवार यांनी टीका करणे टाळले. त्यामुळे शरद पवारांचा दौंडमधील डाव यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपाशी केलेला घरोबा दौंड तालुक्यातील मतदारांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल दौंड विधानसभा मतदारसंघात सहानुभूती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार कांचन कुल यांनी 7 हजार मतांनी पिछाडीवर ठेवले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सुप्रिया सुळे यांनी दौंड विधानसभा मतदारसंघात संपर्क वाढवला होता.

कुल आणि थोरात एकत्र येणे मतदारांना अमान्य

गेल्या 20 वर्षांपासून दौंड तालुक्यातील राजकीय गणिते माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कुल यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीत राहुल कुल आणि रमेश थोरात यांनी एकत्रितपणे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. परंतु या दोन्ही नेत्यांनी मतदारांना सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे केलेले आवाहन मतदारांनी झिडकारून लावले. मुळातच राहुल कुल आणि रमेश थोरात यांनी एकत्रित येणे हेच अनेकांच्या पचनी पडले नाही.

रमेश थोरात यांच्या भूमिकेकडे लक्ष

दौंड विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत भाजपचे आमदार राहुल कुल हे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असतील. त्यामुळे थोरात यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा एक मोठा पर्याय होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे रमेश थोरात हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्याबरोबर जाणार का किंवा अजित पवार यांच्याबरोबरच राहून आपली विधानसभेची तलवार म्यान करणार हे पहावे लागणार आहे. थोरात यांनी शरद पवार यांच्याबरोबर जावे असा मोठा मत प्रवाह त्यांच्या गटात आहे.

सुप्रिया सुळे पक्ष वाढवणार

दौंड तालुक्यातील कोणताही मोठा नेता बरोबर नसताना सुप्रिया सुळे यांनी दौंड विधानसभेतून घेतलेली मतांची आघाडी पाहता आगामी विधानसभा निवडणूक, त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या सुप्रिया सुळे स्वतःच्या पक्षावर लढणार की अजित पवार यांच्याकडे असणारा एखादा बडा नेता आयात करून त्याला उमेदवारी देणार की स्वतःचा पक्ष वाढवणार हे आगामी काळात पहावे लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news