Lok Sabha Elections : पुणेकरांची पसंती मुरलीधर मोहोळच; रवींद्र धंगेकर पराभूत

Lok Sabha Elections : पुणेकरांची पसंती मुरलीधर मोहोळच; रवींद्र धंगेकर पराभूत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवित त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध विजय मिळविला. पहिल्या फेरीपासून मोहोळ यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरले असून, त्यांच्यामुळे मोहोळ यांना विजय शक्य झाला. काँग्रेसचे धंगेकर यांनी वातावरणनिर्मिती चांगली केली होती. मात्र, सर्व मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची कमी असलेली संख्या, प्रचार यंत्रणेतील विस्कळीतपणा याचा परिणाम काँग्रेसच्या प्रचारावर झाला.

धंगेकर यांनी गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. या वेळी मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातच काँग्रेसला रोखले. कसबा पेठेत मोहोळ यांनी मताधिक्य मिळविले. त्या लगतच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने सुमारे 17 हजार मतांची आघाडी मिळविली. मात्र, कॅन्टोन्मेंट मतदारसंघ वगळता पुण्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली. पुण्यातील मतमोजणीला सुरुवात सकाळी आठ वाजता झाल्यानंतर, ईव्हीएम मशिनवरील मतांची मोजणी साठेआठच्या सुमारास सुरू झाली. नऊच्या सुमाराला पहिल्या फेरीत मोहोळ आघाडीवर असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. धंगेकर यांचा जुना प्रभाग कसबा पेठ, तसेच लोहगाव, बालेवाडी, ताडीवाला रस्ता अशा काँग्रेसची चांगली स्थिती असलेल्या भागांत पहिल्या फेरीची मतमोजणी झाली.

मोहोळ यांनी पहिल्या फेरीत 4 हजार 684 मतांची आघाडी घेतली, तर दुसर्‍या फेरीत त्यांना 7 हजार 970, तिसर्‍या फेरीत 6 हजार 339 मतांची आघाडी मिळाली. चौथ्या फेरीच्या अखेरीला मोहोळ यांनी 25 हजार 816 मतांची आघाडी मिळविली. त्यामुळे सकाळी साडेदहाच्या सुमाराला भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण तयार झाले. त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र पराभवाची चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता दिसून येत होती. ज्या भागात त्यांना आघाडी मिळण्याची अपेक्षा होती, तेथेच त्यांना रोखण्यात भाजपला यश मिळाले. विशेषतः कसबा पेठ, शिवाजीनगर, वडगावशेरी मतदारसंघात काँग्रेसला कमी मते मिळाल्याचा त्यांना फटका बसला, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांत सुरू होती.

मतमोजणीच्या अकराव्या फेरीत साडेसहा हजाराचे मताधिक्य मिळवितानाच, मोहोळ यांनी बाराव्या फेरीत सर्वाधिक म्हणजे 13 हजार 834 मतांची आघाडी घेतली. त्यावेळी त्यांचे मताधिक्य 80 हजारांच्या आसपास पोहोचले होते. सोळाव्या फेरीत त्यांनी एक लाख मताधिक्याच्या टप्पा ओलांडला. त्यानंतर त्यांनी आघाडी वाढवित विसाव्या फेरीपर्यंत एक लाख 23 हजारापर्यंत मताधिक्य नेले. टपाली मतदानातही मोहोळ यांनीच आघाडी घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक लाख 23 हजार 38 चे मताधिक्य मिळवित विजय मिळविला. मोहोळ यांना पाच लाख 84 हजार 728 मते मिळाली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांना चार लाख 61 हजार 690 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे 32 हजार 12 मते मिळवित तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

प्रत्येक फेरीत मताधिक्य

पुढील प्रत्येक फेरीत मोहोळ यांचे मातधिक्य वाढत होते. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राची आकडेवारी कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडे देत होते. त्यामुळे मताधिक्य कितीने वाढत चालले, याचीच चर्चा सुरू झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला मोहोळ विजयी होणार याची खात्री भाजप कार्यकर्त्यांना झाली. त्यामुळे मताधिक्याबाबतच त्यांची चर्चा सुरू झाली होती. पाचव्या फेरीत मोहोळ यांनी आठ हजार मतांचे अधिक्य मिळविले. तर नवव्या फेरीत थेट दहा हजार मतांचे अधिक्य मिळविले. तर नवव्या फेरीत थेट दहा हजार मते जादा मिळवित मोहोळ यांनी धंगेकर यांच्यावर 54 हजार 819 मतांची आघाडी घेतली.

धंगेकर आलेच नाहीत

मतमोजणीच्या सुरवातीपासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रावर आले नाहीत. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हेही दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीच मतमोजणीवर लक्ष ठेवले होते.

दुपारनंतर वाढला पावसाचा जोर

दुपारपासून ढगांची दाटी झाली होती. पावणेचार वाजण्याच्या सुमाराला पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहात होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news