बारामतीकरांची लेकीला पसंती; सुळे सलग चौथ्यांदा खासदार

बारामतीकरांची लेकीला पसंती; सुळे सलग चौथ्यांदा खासदार

[author title="राजेंद्र गलांडे" image="http://"][/author]

बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर मात केली. लेक की सून, असा प्रश्न या निवडणुकीत बारामतीकरांपुढे होता. अखेर बारामतीकरांनी सुनेऐवजी लेकीला पसंती दिल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भारी पडल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. स्वतःच्या तालुक्यातूनही अजित पवार हे सुनेत्रा यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा खासदारकी लाखाहून अधिक मताधिक्याने मिळविली. बारामती शहर व तालुक्यानेही अजित पवार यांना अपेक्षित साथ दिली नाही.

चंद्रकांत पाटलांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत चुटकी वाजवत आम्हाला शरद पवार यांचा पराभव वजनदार असल्याचे म्हटले. तेथूनच खरे तर निवडणुकीचा रंग बदलण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक मातब्बरांच्या सभा झाल्या. परंतु, फिरलेले वातावरण बदलण्यासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत.

पवारांनी अवघ्या १० महिन्यात सूत्रे फिरवली

सुळे यांचा विजय बारामतीची राजकीय गणिते बदलून टाकणारा ठरणार आहे. आगामी प्रत्येक निवडणुकीत इथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आता मोठा संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा कधी नव्हे तो पवार कुटुंबात संघर्ष पाहयला मिळाला. गतवर्षी पक्षफुटीनंतर इथे शरद पवार गटाकडे ना पदाधिकारी ना कार्यकर्ते अशी स्थिती होती, परंतु मुरब्बी पवार यांनी अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत ही स्थिती बदलली.

अजित पवरांचं मोठं अपयश!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साखर कारखाने, बँक, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी अशी बलाढ्य ताकद असताना त्यांना पत्नी सुनेत्रा यांना विजयापर्यंत नेता आले नाही. नेतेमंडळी एकीकडे आणि सर्वसामान्य मतदार दुसरीकडे अशी स्थिती या निवडणुकीत दिसून आली. अजित पवार यांच्याकडे बलाढ्य ताकद असतानाही सुळे यांचा विजय होणे अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक बाब आहे.शिवाय भविष्यासाठी धोकादायकही आहे. निवडणूक प्रचारात भाजप व शिंदे गटासह रिपाइंने अजित पवार यांना मोठी साथ दिली. परंतु राष्ट्रवादीच्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले नसल्याचे हा निकाल सांगतो आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news