अमोल कोल्हे समर्थक गुलाल उधळण्याच्या तयारीत; आढळराव पाटील यांचे कार्यकर्ते चमत्काराच्या अपेक्षेत

अमोल कोल्हे समर्थक गुलाल उधळण्याच्या तयारीत; आढळराव पाटील यांचे कार्यकर्ते चमत्काराच्या अपेक्षेत

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच विविध सर्वेक्षण समोर येऊ लागले आहेत. यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात बहुतांश सर्वेक्षण अमोल कोल्हे यांच्या बाजूने असल्याने कोल्हे समर्थक कार्यकर्ते कमालीचे जोशात आहेत. 'अमोल कोल्हे विजयी होणारच', 'पवारसाहेबांचा आशीर्वाद नक्की कामाला आला' असे कार्यकर्ते एकमेकांशी बोलत असून, दि. 4 जून रोजी आपणच गुलाल उधळणार, या आनंदात कोल्हे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जरी दि. 4 जून रोजी असला, तरी विविध प्रकारचे सर्वेक्षण अमोल कोल्हे यांच्या बाजूने झुकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते कमालीचे खूष आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसांत जल्लोष करताना दिसत आहेत.

'लोकसभेची बाजी मारली, आता विधानसभासुद्धा जिंकायचीच' या ईर्षेने कामाला लागायचे, असा मानस कार्यकर्ते आता व्यक्त करू लागले आहेत. अर्थात, 4 तारखेला निर्णय नेमका काय लागतोय? याकडे देखील या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव विजयी झाले, तर मात्र सगळ्या सोंगट्या उलट्या फिरू शकतात. कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांचा सध्या जोश पाहायला मिळत असला, तरी सगळ्यांचेच दि. 4 जूनच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील या वेळी आमचे 'दादा'च विजयी होणार, अशी खात्री आहे.

सध्या प्रसिद्ध होणारे सर्वेक्षण खोटे ठरणार असून, शिवाजीराव आढळराव पाटील नक्की विजय मिळवतील, दि. 4 जून रोजी पाहा काय चमत्कार होतोय, असेही आढळराव समर्थक कार्यकर्ते सांगत आहेत.

…तर चार विधानसभांची गणिते बदलणार!

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे दुसर्‍यांदा निवडून आले, तर मतदारसंघातील चित्र मोठ्या प्रमाणात बदललेले पाहायला मिळू शकते. प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार विधानसभांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपली ताकद पणाला लावून विजय खेचून आणण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करू शकतो. त्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार्‍यांना विधानसभा निवडणुकीतसुद्धा धडा शिकवायचाच, असा चंग महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बांधत आहेत.

शिवसेनेला (उबाठा) जुन्नर विधानसभेची आशा

लोकसभा निवडणुकीला जुन्नरमधून शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला होता. आता विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या (उबाठा) स्थानिक नेत्यांना आहे. शिवसेनेकडून (उबाठा) विधानसभेसाठी माऊली खंडागळे यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून सत्यशील शेरकर यांचे नाव चर्चेत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news