पोलिसांची शिरजोरी ! वाहतूक नियमांचा भंग; पाय दाबण्याची शिक्षा | पुढारी

पोलिसांची शिरजोरी ! वाहतूक नियमांचा भंग; पाय दाबण्याची शिक्षा

पुणे/वडगाव शेरी : पुढारी : वृत्तसेवा : कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे दोन अभियंत्यांचा जीव गेला होता. या अल्पवयीन मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा केली होती. ही शिक्षा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर येरवडा वाहतूक पोलिस अधिकार्‍यांनी वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी युवकाला पाय दाबण्याची शिक्षा केल्याची चर्चा आहे, तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांवर टीका होत आहे. कल्याणीनगर येथील अपघातानंतर पोलिसांनी ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह विरोधात मोहीम हाती घेतली आहे.

कल्याणीनगर येथे त्यासाठी रात्री नाकाबंदीच्या केली होती. या वेळी वाहतूक पोलिस अधिकार्‍याचे एक युवक पाय दाबत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी युवकाला पाय दाबायला सांगितले असल्याची चर्चा आहे. संबंधित युवकाकडे गाडीचे कागदपत्र नव्हते. त्यामुळे त्याच्यावर वाहतूक पोलिस कारवाई करणार होते. पण, कारवाई टाळण्यासाठी पाय दाबण्याची शिक्षा केल्याची चर्चा आहे.

कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडीने दोन अभियंत्यांना उडवले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाला शिक्षेपासून वाचवण्यासाठी पोलिस, डॉक्टरसह विविध यंत्रणाने कसा भ्रष्टाचार केला हे समोर आले होते. या प्रकरणानंतर येरवडा पोलिसांचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच, दोन जणांचा जीव घेणार्‍या मुलाला तीनशे शब्दांत निबंध लिहिण्याची शिक्षा केली होती. या शिक्षेमुळे पोलिस, बाल न्यायमंडळ, ससूनचे डॉक्टर यांचे अनेक मिम्स समाज माध्यमावर प्रसिद्ध झाले होते. या प्रकाराला दोन आठवडे होत नाही, तोच पुन्हा येरवडा वाहतूक विभागाच्या पोलिसांचा प्रताप उघडकीस आला आहे. याविषयी येरवडा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शैलेश संके म्हणाले, नाकाबंदीदरम्यान आमच्या विभागाचे उपनिरीक्षक अशोक गोरडे त्या ठिकाणी होते. नेमके काय प्रकरण घडले याची माहिती मी घेत आहे.

आरोप चुकीचा : अशोक गोरडे

येरवडा वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक गोरडे म्हणाले, मी सलग दोन दिवस रात्रपाळी केली, दिवसपाळी केली. रात्री कल्याणीनगर येथे नाकाबंदी करीत असताना माझ्या पायाला गोळा आला म्हणून मी खुर्चीवर बसलो होतो. त्या वेळी तिकडून जाणार्‍या दोन तरुणांनी काय झाले याची चौकशी करीत पाय दाबून देऊ का, अशी विचारणा केली. मी हो म्हटल्यानंतर त्याने पाय चोळून दिला. तपासणीदरम्यान पकडलेल्या तरुणाकडून पाय दाबून घेतल्याचा आरोप चुकीचा आहे.

हेही वाचा

Back to top button