पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केट, टास्क फ्रॅाड आणि क्राइम ब्रॅंचच्या धाकाने सायबर चोरट्यांनी शहरातील सात जणांना तब्बल 84 लाख 32 हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यांत सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विमाननगरमधील महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 41 लाख 92 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अमेलिया, चंद्रप्रकाश पेडियार नाव्याच्या व्यक्तीसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेशी सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटसंदर्भात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देऊ, असे सांगून विश्वास संपादन केला.
पुढे त्यांना एका ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. बिबवेवाडीतील एका व्यक्तीला अशाच प्रकारे सायबर ठगांनी गंडा घातला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 3 लाख 58 हजार रुपये उकळले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी हमीर गडवी, संजय कुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. कात्रज-कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीला सायबर ठगांनी पोलिस असल्याची बतावणी करीत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी 39 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव शुक्ला, रमेश देव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी तरुणीला ते दिल्ली पोलिस व सायबर पोलिस बोलत असल्याचे सांगून संपर्क केला. तरुणीला विश्वास वाटावा म्हणून बनावट ओळखपत्र देखील दाखविले. त्यानंतर तुमच्याविरुद्ध आमच्याकडे केस असून, अटक होईल, असे धमकाविले. मात्र, त्यामध्ये मदत करून केस क्लीअर करण्याबरोबरच एनओसी देण्यासाठी मनीलाँड्रिंग झाल्याचे सांगून पैसे उकळले. पार्ट टाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून टास्क फ्रॅाडद्वारे कोंढव्यातील एका 42 वर्षीय व्यक्तीला सायबर ठगांनी 11 लाख 44 हजारांचा गंडा घातला. टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून फिर्यादींसोबत संपर्क साधून ही फसवणूक केली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटला रिव्ह्यूव टाकण्याच्या बहाण्याने पट टास्कद्वारे ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साईबाबानगर कोंढवा येथील 29 वर्षीय तरुणाची देखील अशाच पद्धतीने 4 लाख 26 हजारांची फसवणूक केली आहे. हडपसरमधील तरुणीला टास्क रिव्ह्यूव देण्याच्या बहाण्याने 9 लाख 53 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मगरपट्टा हडपसरमधील 34 वर्षीय तरुणीची देखील सायबर ठगांनी प्रीपेड टास्क देऊन आठ लाख 61 हजारांची फसवणूक केली आहे.
हेही वाचा