पोक्सोतील आरोपीला आजन्म जन्मठेप

पोक्सोतील आरोपीला आजन्म जन्मठेप

पौड : पुढारी वृत्तसेवा : पुणे विशेष सत्र न्यायालयाने मुळशी तालुक्यातील बलात्कार व पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. आजन्म जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव अजय किसन शेळके (वय 26) असे आहे.

मुळशी तालुक्यातील घटना

मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पौड पोलिसांनी अजय किसन शेळके (वय 26) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आरोपी अजय शेळके हा 27 जुलै 2021 पासून कोठडीत आहे. 24 मे 2024 रोजी बोर्डावर आलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला. त्यामध्ये अजय शेळके याला भादंविखाली शिक्षा न देता पोक्सो कलमान्वये शिक्षा सुनविण्यात आली.

यामध्ये पोक्सो कलम 6 अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व 30 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, पोक्सो कलम 10 अन्वये 7 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, पोक्सो कलम 12 अन्वये 3 वर्ष सक्त्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद, भादंवि कलम 354 अन्वये 5 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद, भादंवि 506 अन्वये 2 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद तसेच वरील शिक्षा एकत्र भोगावी व एकूण दंडाचे 65 हजार रुपये आरोपीने भरल्यावर ती रक्कम पीडितेला देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

पीडितांवर दबाव

या गुन्ह्यामध्ये विशेष सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला होता. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालय येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या वेळी पीडित मुलीचे पालक न्यायालयात उपस्थित असल्याचे पाहून न्यायमूतींनी त्यांच्याकडे चौकशी केली. ते प्रचंड दबावाखाली असल्याचे आणि खुल्या न्यायालयात बोलू शकत नसल्याचे न्यायमूर्तींनी हेरले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात तत्काळ रोजच्या रोज सुनावणी घेण्याबाबत आदेश पुणे न्यायालयाला दिले होते.

हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यामुळे या गुन्हाचा निकाल एक महिन्याच्या आत लावण्यात आला. यासाठी सरकारी वकील विद्या विभुते यांनी मेहनत घेतली. या गुन्ह्याचा तपास पौड पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी केला होता. या घटनेवर पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव हे लक्ष ठेवून होते. कोर्ट अंमलदार म्हणून अल्ताफ हवालदार यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांनी कामकाज पाहिले.

पोक्सोचा गुन्हा नात्यात किंवा ओळखीच्या ठिकाणीच होतो. पोक्सोअंतर्गत होणार्‍या घटनामध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण या अंतर्गत ही मोठी शिक्षा सुनविण्यात आलेली आहे. या शिक्षेमुळे पुढील काळात मुळशी तालुक्यात पोक्सोअंतर्गत गुन्हे कमी होऊ शकतात. उच्च न्यायालयाने रोजच्या रोज सुनावणी घेण्याचे सांगितल्यानंतर ऐन निवडणूक काळात पौड पोलिसांची मोठी धावपळ झाली. मात्र आरोपीला झालेल्या शिक्षेबद्दल सर्वांनी पौड पोलिसांचे अभिनंदन केले.

– मनोजकुमार यादव,
पोलिस निरीक्षक, पौड पोलिस ठाणे

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news