तब्बल 80 वर्षांनंतर प्रोमेथियमचे संयुग बनवण्यात यश

तब्बल 80 वर्षांनंतर प्रोमेथियमचे संयुग बनवण्यात यश
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी अतिशय दुर्लभ आणि रहस्यमय अशा रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थ असलेल्या प्रोमेथियमची रहस्ये उलगडली आहेत. प्रोमेथियमवर सुमारे 80 वर्षांपासून संशोधन सुरू होते. हा पदार्थ इतका दुुर्मीळ आहे की, पृथ्वीच्या क्रस्टमध्येही एकेकाळी केवळ 500 ते 600 ग्रॅम प्रोमेथियम अस्तित्वात होता. त्याचे सर्व आयसोटोप रेडिओअ‍ॅक्टिव्ह असतात. पिरियॉडिकल टेबल म्हणजेच आवर्त सारणीत सर्वात खालील 15 लँथेनाईड पदार्थांपैकी हा एक आहे. आता वैज्ञानिकांना प्रथमच 'प्रोमेथियम-147'चे संयुग बनवण्यात यश आले आहे.

लँथेनाईड हे असे पदार्थ असतात जे पिरियॉडिकल टेबलमध्ये लॅन्थनमनंतर येतात. त्यांना दुर्लभ मृदा तत्त्वही म्हटले जाते. या धातूंमध्ये शक्तिशाली चुंबकत्व आणि अजब प्रकाशीय विशेषत: असते. लँथेनाईड पदार्थांचा वापर सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये होत असतो. प्रोमेथियमचा शोध सुमारे आठ दशकांपूर्वी 1945 मध्ये लावण्यात आला होता. वैज्ञानिक प्रथमच या रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थाला अन्य अणुंशी जोडून एक रासायनिक संयुग बनवण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळे रसायनशास्त्रज्ञांना प्रोमेथियमच्या गुणधर्मांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळेल. पुस्तकांमध्ये प्रोमेथियमची अधिक माहिती उपलब्ध नाही.

अमेरिकेच्या ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी प्रोमेथियमचा शोध लावला होता. आता तेथीलच संशोधकांनी हे यश मिळवले आहे. या पदार्थाविषयी समजून घेणे कठीण होते कारण योग्य असा नमुनाच उपलब्ध होत नव्हता. प्रोमेथियमचा एखादा स्थिर आयसोटोप नाही. सर्व आयसोटोप रेडिओअ‍ॅक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सारी असल्याने काळाच्या ओघात त्यांचा क्षय होत राहतो. वैज्ञानिक प्रोमेथियमला एका फिशन प्रोसेसने मिळवतात. 'ओआरएनएल'च 'प्रोमेथियम-147'चे एकमेव उत्पादक आहे. हे एक असे आयसोटोप आहे, ज्याची अर्द्ध-आयु 2.6 वर्षांची असते.

गेल्याच वर्षी विकसित केलेल्या पद्धतीने वैज्ञानिकांनी न्यूक्लिअर म्हणजेच आण्विक कचर्‍याच्या धारांमधून या आयसोटोपला वेगळे केले. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हे सर्वात शुद्ध सँपल होते. त्यानंतर वैज्ञानिकांनी या सँपलला लिगँडशी जोडले. लिगँड हे विशेषत्वाने डिझाईन केलेला अणू असून, त्याच्या मदतीने धातूच्या अणूंना अडकवले जाते. संशोधकांनी प्रोमेथियम-147 आणि लिगँडला जोडून पाण्यात एक जटिल संयुग बनवले. वैज्ञानिक अलेक्झांडर इवानोव्ह यांनी याबाबतची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news