Water Scarcity | पाण्याचे स्त्रोत संपुष्टात आल्याने पाणीबाणी

चांदवड : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हातून तीन किमी अंतरावरून पाणी वाहताना आदिवासी महिलांसोबत अंगावर साधे कपडेही नसलेली त्यांची लहान लहान बालके.(छाया – सुनिल थोरे).
चांदवड : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हातून तीन किमी अंतरावरून पाणी वाहताना आदिवासी महिलांसोबत अंगावर साधे कपडेही नसलेली त्यांची लहान लहान बालके.(छाया – सुनिल थोरे).

[author title="चांदवड, (जि.नाशिक) सुनिल थोरे :" image="http://"][/author]
"साहेब वीस बावीस दिवस पाणी येत नाही, विहिरी, बोअरवेल आटल्या.. घोटभर पाणी प्यायला मिळत नाही…पाणी मिळालेच तर पिण्यासाठी अन स्वयंपाक बनवण्यासाठी वापरावे लागते.. तेव्हा अंघोळ करणे.. कपडे धुणे बंद झाले आहे… एक एक जनावरे १० ते १२ लिटर पाणी पेत… जनावरांना पाणी द्यायचे का माणसांनी पाणी प्यायचे" असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतका भयानक दुष्काळ चालूवर्षी पडला आहे. शासनाकडून पुरवठा होणारे पाणी अत्यल्प असल्याने तहान भागवणे मुश्कील झाले आहे. पाण्यासाठी चांदवड तालुक्यात चोरीचे प्रकार वाढले आहे.

नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यात चालूवर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. हा दुष्काळ सन १९७२ साली पडलेल्या दुष्काळाची जाणीव करून देतो. तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत असलेले केद्राई, राहूड, जांबूटके, खोकड तलाव आटले आहे. या तलावांवर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष भेडसावू लागले आहे. आज ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी १५० ते १८० फुट खोलपर्यंत गेली आहे. यामुळे थोड्या फार प्रमाणात बोअरवेलचे पाणी देखील आटले आहे. पर्यायाने तालुक्यातील ११२ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे.

विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांनी केलेली ड्रमची गर्दी.(छाया – सुनिल थोरे).
विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांनी केलेली ड्रमची गर्दी.(छाया – सुनिल थोरे).

या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाद्वारे तालुक्यातील २९ गावे ९७ वाड्यांना ८९ टॅंकरद्वारे दररोज १२ ते १३ लाख लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी शासनाचा करोडो रुपये खर्च होत आहे. शासनाकडून केला जाणारा पाणी पुरवठा अन पाण्याची मागणी यात मोठी तफावत असल्याने नागरिकांची तहान भागवणे प्रशासनाला अवघड झाले आहे. वाढलेल्या तापमानात प्रत्येक जण पाणी पाणी करीत आहे. पाणी असेल तर जगणे सोपे आहे. पाणी नसेल तर जगणे अवघड झाले आहे. यांचा प्रत्यय आज गावागावातील, वाड्यावस्त्यांवरील प्रत्येक जण अनुभवतो आहे. पाण्यासाठी नागरिक तीन ते चार किमीपर्यंत दररोज भटकंती करत आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या हाती निराशा येत आहे. हंडा दोन हंडे मिळालेले पाणी नागरिक फक्त अन फक्त पिण्यासाठी वापरत आहे. नागरिकांनी अंघोळ, कपडे धुने बंद केले आहे. पाणीच मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गावागावात पाण्यासाठी नागरिक हंडा मोर्चे, आंदोलने करताना दिसत आहे.

या गावांचे प्रस्ताव प्राप्त –

तालुक्यातील गोहरण, भयाळे, हांडगे वस्ती, कांगुणे वस्ती, आडगाव, दहेगाव या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचे टॅकर सुरु करण्याचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत.

तालुक्यातील २९ गावे व ९७ वाड्यांना प्रशासनाकडून टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टॅकर सुरु करण्यासाठी दोन ते तीन गावांचे प्रस्ताव आले असून तेथे लगेच टॅकर सुरु केले जातील. – मंदार कुलकर्णी, तहसीलदार.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news