‘एसी’मधील कामाला मिळतेय पसंती; कष्टाला नकार

‘एसी’मधील कामाला मिळतेय पसंती; कष्टाला नकार
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात विविध उत्पादनांची निर्मिती करणार्‍या उद्योगांमध्ये सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. तरुणांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेऊन आयटी अभियंता होण्याकडे कल वाढला आहे. एसीमध्ये बसून करता येणार्‍या कामांला पसंती मिळत असून कष्टाच्या कामाला नकार दिला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात छोटे-मोठे सुमारे 10 हजार उद्योग आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी क्षेत्र, हिंजवडी इन्फोटेक पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी असा औद्योगिक विस्तार झाला आहे.

कोणत्या कुशल कामगारांचा तुटवडा?

उत्पादन निर्मिती उद्योगांमध्ये प्रामुख्याने सीएनसी मिलिंग मशीन ऑपरेटर, दंडगोलाकार ग्राईंडर आणि सरफेस ग्राईंडर मशीन यांच्यासाठी आवश्यक ग्राईंडरची कमतरता जाणवत आहे. ऑर्गन वेल्डिंग, बॉयलर वेल्डिंग आदींसाठी पुरेसे वेल्डर मिळत नाही. इन्स्पेक्शन मशीनसाठी मशीन ऑपरेटरची कमतरता आहे. त्याशिवाय, प्रेस ऑपरेटर, लेथ मशीन ऑपरेटर, सीएनएसी प्रोग्रॅमर, बेंडिंग मशीन ऑपरेटर, डायमेकर, फीटर, टर्नर आदी कौशल्य आत्मसात असणार्‍या कामगारांचीदेखील कमतरता जाणवत असल्याचे काही उद्योजकांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

मागणी जास्त, पुरवठा कमी

मागणीच्या तुलनेत कुशल मनुष्यबळाचा पुरवठा किती होतो आहे, याबाबत माहिती घेतली असता जर 100 कुशल कामगारांची मागणी एखाद्या उद्योगाला असेल तर त्याच्या तुलनेत 50 कुशल कामगारच मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे हे व्यस्त प्रमाण पाहता लघुउद्योजकांना एकाच कामगाराकडून विविध कामे करून घ्यावी लागतात. त्यासाठी संबंधित कामगारांना नवे-नवे कौशल्य शिकवावे लागते. मोठ्या कंपन्यांमध्येही उपलब्ध मनुष्यबळात काम करताना जे कामगार नवे-नवे कौशल्य आत्मसात करतात त्यांना पगारवाढ आणि प्रमोशन मिळते. कुशल कामगारांची गरज भागविण्यासाठी बर्‍याचदा जादा पगार देऊन दुसर्‍या कंपन्यांमधील कामगार आपल्याकडे ओढून घेतले जातात.

तरुणांना हवे एसीत बसून काम

आयटी क्षेत्रामध्ये मिळणारा चांगला पगार आणि सुविधा लक्षात घेता तरुणांचा कल आयटी अभियंता होण्याकडे वाढत चालला आहे. त्यांच्याकडून कार्यालयात एसीमध्ये बसून होणार्‍या कामाला प्राधान्य दिले जात आहे. पर्यायाने, उद्योगांमध्ये कष्टाचे काम करण्यासाठी कुशल कामगारांची कमतरता जाणवू लागली असल्याचे निरीक्षण उद्योजक विकास नाईकरे यांनी मांडले.

पाच वर्षांपासून जाणवतेय कमतरता

गेल्या पाच-सहा वर्षांपासून शहरातील उत्पादन उद्योगात कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्राबरोबरच आता उत्तर प्रदेश, गुजरात, चेन्नई येथेदेखील उद्योगांचे जाळे विस्तारले आहे. त्यामुळे त्या भागातही कुशल कामगार नोकरीनिमित्त जात आहेत. पर्यायाने, परराज्यातून येणार्‍या कुशल कामगारांचे प्रमाण कमी होत चालले
आहे. त्याशिवाय, कुशल कामगार घडविण्यासाठी सध्या असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. पर्यायाने, मागणीनुसार पुरेसे कुशल मनुष्यबळ पुरविण्यात या संस्था कमी
पडत आहेत.

शहरामध्ये विविध प्रकारचे उत्पादन करणार्‍या उद्योगांमध्ये सध्या कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी उद्योगांच्या बदलत्या मागणीनुसार आयटीआयमधून नवीन अभ्यासक्रम सुरू व्हायला हवेत. त्याचप्रमाणे, जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर आयटीआयची संख्या वाढवायला हवी.

– विकास नाईकरे, उद्योजक

शहरातील उत्पादन निर्मिती उद्योगांना हवी असलेली कुशल कामगारांची गरज भागविण्यात सध्या आयटीआय कमी पडत आहेत. सध्या अभियंते मिळतात मात्र कुशल कामगार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना विविध कौशल्यांचे ट्रेनिंग द्यायला हवे. मोठ्या उद्योगांनीदेखील त्यांचे ट्रेनिंग सेंटर उभारून कुशल कामगार घडविले पाहिजे.

– प्रमोद राणे, उद्योजक

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news