[author title="सीताराम लांडगे " image="http://"][/author]
लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा: पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील गौणखनिजाची चोरी करणार्या माफियांवर कारवाईसाठी स्थापन केलेले पथकच या माफियांशी तडजोडी करण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे. कारवाई करण्याऐवजी तडजोडीचा धंदा पथकाने जोरात सुरू केला असून, जिल्हाधिकार्यांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे.
मंगळवारी (दि. 28) या पथकाने हवेली तालुक्यात खडी वाहतूक करणार्या शेकडो वाहनांची तपासणी केली. परंतु, या दंडाच्या कारवाईची भर सरकारी तिजोरीत झालीच नाही, इतर कोणाचे खिसे यात गरम झाले, याची चौकशी आता जिल्हाधिकार्यांनी करण्याची गरज आहे. या पथकाने कोणत्याही वाहनावर कारवाई केल्याचा अहवाल ना जिल्हाधिकार्यांना सादर केला, ना लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयात जमा केला. मग, हा लाखो रुपयांचा मलिदा कोणी रिचवला, याची जोरदार चर्चा महसूल विभागात सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात महसूल विभागाने वाळू, माती, मुरूम यांचा बेकायदेशीर उपसा, टेकडी, डोंगर पोखरणे, बेकायदा गौणखनिजाची वाहतूक करणारी वाहने यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकार्यांनी या जिल्हास्तरावरील पथकाची स्थापना केली आहे. अधिक माहिती घेतली असता महसूल विभागातील सूत्रांनुसार काही कागदावर दाखवण्यापुरत्या तकलादू कारवाई वगळता जिल्ह्यात कोठेही या पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे दिसत नाही, असे चित्र पाहावयास मिळते.
या पथकातील काही अधिकार्यांनी मंगळवारी हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात खडीक्रशर असलेल्या परिसरात कारवाईसाठी धडक दिली. त्यांनी दोन खडीक्रशरची तपासणीही केली. त्यानंतर वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी केली. जवळ जवळ दोनशे वाहनांची तपासणी केली. यातील बरीचशी वाहने बेकायदा गौणखनिजाची वाहतूक करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. परंतु, पथकाला एवढी मोठी पाहणी केल्यानंतर काहीच गैर आढळले नाही, असे दिसते. कारण, या पथकाने या कारवाईचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला नाही की एकही वाहन ताब्यात घेऊन जप्त करून जमा केलेले नाही. अशी कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबविता परस्पर वाहने सोडून दिली का? अशी शंका आता महसूल विभागात व्यक्त होऊ लागली आहे.
गौणखनिज वाहतुकीची वाहने अशी सोडली जात नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. परंतु, मंगळवारी या पथकाने कारवाई केली. मात्र, शासकीय तिजोरीत दंड जमा न करता तो कोठे जमा केला, याची चर्चा हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे. आता जिल्हाधिकारी या आर्थिक कारवाईवर चौकशी लावणार का? याची उत्सुकता आहे.
गौणखनिज पथकाची स्थापना कारवाईसाठी केली आहे. परंतु, यांच्या सर्व कारवाया वादाच्या भोवर्यात सापडल्याचे समजते. कारवाईला जाताना शासकीय अधिकारी व कर्मचारी आवश्यक असताना या पथकात खासगी दलालांचा भरणा असतो, असेही समजते.
शासकीय वाहन कारवाईसाठी घेऊन जाणे आवश्यक असताना या पथकात खासगी वाहने कारवाईसाठी वापरली जातात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौणखनिजाची चोरी होते, त्यावर कारवाई होण्याऐवजी पुणे शहर व उपनगरांतील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांवर छापा टाकण्यातच मोठा रस या पथकाला असतो, याची संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे.
वाळू चोरांनी इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर या पथकाने खरेतर आपला मोहरा इंदापूर, दौंडकडे वळवून या माफियांवर दरारा बसेल अशी कारवाई हाती घेण्याची गरज होती. परंतु, पथक थंडच राहिले आणि पुणे शहर परिसरात घुटमळत राहिले.
हेही वाचा