पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्तांच्या नावाने व्हॉट्सअॅप कॉलिंग करून पालिकेच्याच अधिकार्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, यापूर्वी अशा पद्धतीचा प्रकार घडला असल्याने आयुक्तांनी तातडीने अशा पद्धतीने कोणी पैसे मागत असल्यास देऊ नका, असे सर्व अधिकार्यांना कळविले. दोन वर्षांपूर्वी माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या नावानेही आलेल्या मेसेजला फसून पालिकेच्या एका अधिकार्याने तब्बल 1 लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर पाठवले होते. आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावानेही पैसे मागण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.
आयुक्तांच्या कॉलर आयडीला आयुक्तांचे नाव आणि पद वापरून अधिकार्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल केला जातो. त्या वेळी मोबाईल नंबर सेव्ह नसला तरी डीपीवर आयुक्तांचा फोटो आणि खाली नाव दिसत असल्याने आयुक्तांचा खासगी नंबर असेल, असे समजून अधिकार्यांकडून फोन उचलले जातात. या वेळी, 'मी आयुक्त बोलतोय, कामात आहात का?' अशी विचारणा करून फोन कट केला जातो. नंतर पुन्हा काही वेळाने फोन करून 'मी बैठकीत आहे. माझे एक महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे तातडीने माझ्या या नंबरवर पैसे पाठवा अथवा गिफ्ट व्हाऊचर पाठवा,' अशी मागणी करत 'मी नंतर बोलतो,' असे सांगून फोन कट केला जात आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी असा प्रकार घडला असल्याने अधिकार्यांनी तातडीने आयुक्तांच्या हा प्रकार निदर्शनास आणला. त्यामुळे अधिकार्यांची फसवणूक टळली.
हा प्रकार संंबंधित अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिला. त्यानंतर असे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कोणीही फेक कॉलला भुलू नये. पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका
हेही वाचा