कोल्हापूर : माकडाने अचानक पुढ्यात उडी मारली; भीतीने बालकाचा मृत्यू

कोल्हापूर : माकडाने अचानक पुढ्यात उडी मारली; भीतीने बालकाचा मृत्यू

नूल; पुढारी वृत्तसेवा : माकडाने अचानक पुढ्यात उडी मारल्याने घाबरलेल्या आठ वर्षीय मुलाचा हृदयक्रिया बंद पडून जागीच मृत्यू झाला. हिटणी (ता. गडहिंग्लज) येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. संकेत सुनील पाटील, असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूने अख्खा गाव हळहळला.

हिटणी गावापासून दीड कि.मी. वरील लक्ष्मी मळ्यात रुद्रापगोळ वसाहतीमध्ये दहा-पंधरा कुटुंबे राहतात. मंगळवारी सायंकाळी येथील काही मुले क्रिकेट खेळून घरी परतत होती. यावेळी चेंडू घ्यायचा विसरला हे लक्षात आल्यावर लहानगा संकेत पळत पुन्हा झाडाखाली गेला. चेंडू घेत असतानाच झाडावर बसलेल्या कळपातील मोठ्या माकडाने अचानक त्याच्या पुढ्यात उडी घेतली. माकडाला घाबरून संकेत ओरडला अन् जाग्यावर निपचित पडला.

इतर मुलांनी आरडाओरडा केल्यावर ग्रामस्थ जमा झाले. संकेतला उपचारांसाठी संकेश्वरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, भीतीने संकेतचे हृदय बंद पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संकेतचे वडील सुनील शेतकरी आहेत. आजी-आजोबांच्या संस्कारात वाढलेला संकेत विद्यामंदिर हिटणी प्रशालेत शिकत होता. चित्रकला, गणित विषयांत त्याला आवड होती. बेरीज-वजाबाकीत तरबेज असणार्‍या संकेतच्या आयुष्याचे गणित मात्र एका माकडाच्या उडीने बिघडवले, अशी घटनास्थळी चर्चा होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news