Ganesh Idol Making Workshop: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा; उपायुक्त संतोष वारूळे यांचे आवाहन

लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, त्यांच्यात पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली पाहिजे.
Pune News
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा; उपायुक्त संतोष वारूळे यांचे आवाहन Pudhari
Published on
Updated on

Pudhari Eco Friendly Ganesh Idol Making Workshop for Student

पुणे: पर्यावरणाच्या रक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक कायदे केले आहेत. पण, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जनसहभागातूनच होऊ शकते. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, त्यांच्यात पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली पाहिजे.

त्यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी मंगळवारी (दि. 12) केले. घरी शाडूच्या मातीतून तयार केलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा. पर्यावरणरक्षण हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.(Latest Pune News)

Pune News
Ganeshotsav 2025: 'उपनगरांतही आदर्श गणेशोत्सव साजरा करणार'

दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाला स्फूर्ती’ या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेच्या विशेष सहकार्याने आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणेचे प्रादेशिक विभागीय अधिकारी बाबासाहेब कुकडे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. पुणेचे संचालक पुरुजित परदेशी, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या (धनकवडी) मुख्याध्यापिका माधवी के, दै. ‘पुढारी’ पुणेचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, मार्केटिंग विभागाचे रिजनल हेड संतोष धुमाळ, दै. ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीगणेशवंदना सादर केली आणि त्यानंतर भारती विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.

वारुळे म्हणाले, ‘प्रत्येक उत्सवात महत्त्वाचा भाग असतो तो जनजागृतीचा. दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. गणेशोत्सव आपल्याकडील महत्त्वाचा उत्सव आहे. त्यामुळे तो उत्साहाने साजरा केलाच पाहिजे. पण, त्याशिवाय पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, याकडे आपण भरही दिला पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला पाहिजे. विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश रुजविण्यासाठी अशा कार्यशाळा झाल्या पाहिजेत. सुनील माळी यांनी प्रास्ताविक केले. रूपचंद पवार यांनी आभार मानले.

डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये आज कार्यशाळा

कधी : बुधवारी, 13 ऑगस्ट

कुठे : डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक रस्ता, पुणे

वेळ : सकाळी 9.30

चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पाचे सगुण रुप

हातात शाडूची माती आली अन् त्यांनी श्रीगणेश तयार करायला सुरुवात केली... प्रत्येक विद्यार्थी मन लावून मूर्ती तयार करू लागला... काही वेळाने बाप्पाची मूर्ती सगळ्यांनी साकारली अन् विद्यार्थ्यांचे चेहरे उत्साहाने फुलले... बाप्पाचे विलोभनीय रूप पाहून प्रत्येक जण आनंदी झाला. निमित्त होते दै. ‘पुढारी’ आयोजित ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाला स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे. या कार्यशाळेत धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शाडूच्या मातीतून श्रीगणरायाची मूर्ती साकारली अन् विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा महत्त्वपूर्ण संदेशही रुजविण्याचा प्रयत्न केला.

दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाला स्फूर्ती’ या कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 12) झाले. या कार्यशाळेला पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक सॉलिटर ग्रुप, सहप्रायोजक गोयल गंगा ग्रुप आहे. एज्युकेशन पार्टनर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, एन्व्हॉयर्मेंट पार्टनर ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि., को-पार्टनर एमआयटी डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन आहे.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणसंवर्धनाचे बीज रुजावे आणि पर्यावरणरक्षक तयार व्हावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शाडू मातीतून बाप्पाची मूर्ती साकारली.

सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हाती शाडूची माती देण्यात आली. कार्यशाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मूर्ती कशी साकारायची, याविषयी माहिती देत होते. त्या पद्धतीने विद्यार्थी मूर्ती तयार करीत होते आणि प्रत्येक जण रममाण होऊन मूर्ती साकारत होता. काही वेळानंतर प्रत्येकाने उत्कृष्टपणे बाप्पाची मूर्ती साकारली आणि प्रत्येकाचे चेहरे आनंदले. प्रत्येकाच्या मनातले बाप्पा प्रत्यक्षात त्यांच्याच हातातून साकारले गेल्याने मूर्ती साकारल्यानंतरचा विद्यार्थ्यांचा आनंद अन् उत्साह काही औरच होता. फक्त इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल आपले मत मांडत त्याविषयीची जनजागृतीही केली.

भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत त्यांनी शाडूच्या मूर्तीमुळे होणार्‍या पर्यावरणसंवर्धनासह विद्यार्थ्यांना पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची, याविषयी माहिती दिली. साच्याच्या माध्यमातून श्रीगणेशमूर्ती कशी तयार करावी, याची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमधील उत्साह वाखाणण्याजोगा होता.

श्रीगणेश आम्हाला आवडतात, आम्ही घरी श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो. आमच्या घरी शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. आज शाडू मातीतून बाप्पाची मूर्ती साकारताना खूप आनंद झाल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी नोंदविल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शाडूची श्रीगणेशमूर्ती तयार केली.

कार्यशाळेत सहभागी झालेली विद्यार्थिनी मनस्वी बांगर म्हणाली, श्रीगणेश मला खूप आवडतात. आज बाप्पाची मूर्ती तयार करून खूप आनंद वाटला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे खूप गरजेचे आहे. त्यातून आपल्या पर्यावरणाचे रक्षण होईल. प्रत्येकाने त्याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे.

विद्यार्थी पीयूष मोरे म्हणाला, शाडूच्या मातीच्या साहाय्याने बाप्पाची मूर्ती साकारल्याचा आनंद आहे. आम्ही मित्र-मैत्रिणींनी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आता आम्ही ही मूर्ती घरी घेऊन जाणार आहोत आणि पालकांना दाखवणार आहोत. या कार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळाले आणि पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, हे समजले.

दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेला हा उपक्रम आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळेच भारती विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणसंवर्धनासाठीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. दै. ‘पुढारी’ व भारती विद्यापीठाने एकत्र येऊन असे उपक्रम राबविले, तर आपण पर्यावरणाला वाचवू शकू. लहानवयातच मुलांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजविणे आजच्या घडीला खूप महत्त्वाचे आहे.

- डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल

पर्यावरणपूरक असा उपक्रम दै. ‘पुढारी’च्या वतीने घेण्यात येत आहे. या उपक्रमामुळे निश्चितपणे पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न होईल. एक चांगला संदेश समाजात या माध्यमातून जाईल. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला, तर पर्यावरण वाचेल. असे केल्यास भविष्यात पर्यावरणाची समस्या भेडसावणार नाही.

- सुनीता शिरोडकर, गोयल गंगा ग्रुप

पर्यावरण वाचविणे, हे सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. त्या आव्हानावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेला उपक्रम पर्यावरण वाचविण्यासाठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सामाजिक सलोखा राखत असे उपक्रम झाले पाहिजेत.

- अतुल चोरडिया, डायरेक्टर, सॉलिटर ग्रुप

दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. श्रीगणेश हे ज्ञानाचे, बुद्धीचे, चातुर्याचे, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. त्यामुळे शाडूच्या मातीतून बाप्पाची मूर्ती साकारण्याचा हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पोहचेल आणि ते इतरांनाही याबद्दल प्रेरित करतील. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या घरी आणि शेजारी शाडूच्या मातीतून साकारलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा, याविषयी सांगावे. यातून नक्कीच बदल घडेल.

- डॉ. विवेक सावजी, कुलगुरू, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे

पर्यावरणसंवर्धनासाठी आणि लहान मुलांमध्ये पर्यावरणरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी दै. ‘पुढारी’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीतून श्रीगणेशाची मूर्ती साकारण्याचा हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. या माध्यमातून लहान वयातच पर्यावरणसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे होत आहे. आज ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे (पीओपी) घातक परिणाम होत आहेत. पीओपी मूर्तींचा वापर सुरूच राहिला, तर त्याचे दुष्परिणाम फक्त आत्ताच्या पिढीला नव्हे, तर पुढील पिढीलाही भोगावे लागतील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या मूर्ती वापरल्या जाऊ नयेत, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थिदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण झाली पाहिजे. लहानपणापासूनच हे बीज त्यांच्यात रुजवायला हवे. तेव्हाच ते इतरांनाही याबद्दल प्रेरित करतील.

- बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे

दै. ‘पुढारी’च्या उपक्रमात एन्व्हॉयर्मेंट पार्टनर म्हणून ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या संस्थेला सहभागी होताना खूप आनंद होतो आहे. लहान मुलांना शाळेमध्ये पर्यावरणरक्षणाची शिकवण दिली तर पर्यावरणसंवर्धन होईल. पर्यावरणपूरक शाडू मातीची श्रीगणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दै. ‘पुढारी’च्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, हा चांगला उपक्रम आहे.

- पुरुजित परदेशी, संचालक, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. पुणे

पर्यावरण असंतुलित झाले आहे. आज प्रदूषण वाढले आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे की, पर्यावरणाचे रक्षण करावे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणीच पर्यावरणसंवर्धनविषयीची जाणीव निर्माण करावी. त्यातून बदल घडेल. मुलांमध्ये लहानपणीच हे संस्कार रुजविले पाहिजेत. पर्यावरणसंवर्धनाचे महत्त्व समजलेली पिढी तयार करणे हे समाजासाठी खूप गरजेचे आहे. भारती विद्यापीठाकडून हे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

- डॉ. अनुपमा पाटील, प्राचार्या, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स

शाळांमधून हा उपक्रम घेतला जाणार असल्याने त्यातून विद्यार्थी खूप काही शिकतील. पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे, याची आपल्याला जाणीव आहे, या जाणिवेतूनच आपण पर्यावरणसंवर्धनासाठी उभे राहिले पाहिजे. कार्यशाळेची सुरुवात आमच्या शाळेपासून झाली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला, याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी खूप कल्पकतेने मूर्ती तयार केल्या, हे पाहून छान वाटले. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रीगणेशमूर्तीची संकल्पना समाजात खोलवर रुजविणे आवश्यक आहे.

- माधवी के., मुख्याध्यापिका, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी

शाडूच्या मातीतून श्रीगणेशमूर्ती साकारण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनाच आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेतले. विद्यार्थ्यांनीच तयार शाडूच्या मातीतून तयार केलेली श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना घरोघरी केली तर नक्कीच बदल घडेल. पर्यावरणाचा र्‍हास थांबावा, यासाठी आम्ही अशा कार्यशाळा घेत आहोत. आज राज्यभरातील शाळांमध्ये आम्ही अशा कार्यशाळा घेतल्या असून, त्यातून बदल घडला आहे.

- सुनील देशपांडे, शिल्पकला विभागप्रमुख, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news