

पुणे : स्वच्छ सेवा सहकारी संस्था आणि कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतील ८०० हून अधिक कचरावेचकांनी शुक्रवारी (दि. 19) निर्धार सभेसाठी एकत्र येत काही निर्धार केले. दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी ही सभा आयोजित केली होती. सभेत कचरावेचकांनी डॉ. आढाव यांच्या विचारांवर चालण्याचा आणि कृती करण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या 'सत्य सर्वांचे आदिघर' या प्रार्थनेने आणि 'बाबा आढाव जिंदाबाद'च्या घोषणांनी झाली. कार्यक्रमात कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या संस्थापक सदस्या पूर्णिमा चिकारमाने, अध्यक्षा संगीता गाडे यांच्यासह कचरावेचकांनी डॉ. आढाव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
पूर्णिमा चिकारमाने यांनी हमाल पंचायत, कष्टाची भाकर, हमालनगर गृहनिर्माण वसाहत आणि कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत या कचरावेचकांच्या संघटनेच्या स्थापनेमध्ये बाबांचा सिंहाचा वाटा होता, असे सांगितले. संगीता गाडे यांनी डॉ. आढाव यांच्या आठवणींना उजाळा दिला. काही कचरावेचकांनी डॉ. आढाव यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या परिवर्तनाच्या वैयक्तिक कथा सांगितल्या. सुशीला लांडगे, बायडा बाई, सविता साळवे, सीता तमचेकर यांनी भावना व्यक्त केल्या. कचरावेचक सारिका कारडकर आणि विद्या नायकनवरे यांनी डॉ. आढाव यांचे कार्य सुरू ठेवण्याचा मार्ग म्हणून काही निर्धार मांडले. सुमन मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, समाजवादी पक्षाचे दत्ता पाखिरे, आपचे मुकुंद किर्दत उपस्थित होते.
डॉ. आढाव यांच्या तत्त्वांचे खरे वारसदार
सर्व कचरावेचकांची मोजणी, ओळख आणि समावेश सुनिश्चित करण्याचा निर्धार कचरावेचकांनी करून सर्वांना कामाच्या समान संधी मिळतील, याची हमी देण्यासाठी संघटनेतील अंतर्गत विषमता दूर करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. सेवेला महत्त्व देत त्यांनी शहरात नियमित घरोघरी कचरासंकलन, नागरिकांशी चांगले वर्तन आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचा निर्धारही केला. या ठरावांद्वारे कचरावेचकांनी डॉ. आढाव यांच्या तत्त्वांचे खरे वारसदार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.
ओळ - स्वच्छ सेवा सहकारी संस्था आणि कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतील ८०० हून अधिक कचरावेचक निर्धार सभेसाठी एकत्र आले आणि त्यात त्यांनी काही निर्धारही केले.