pune porsche accident : बिल्डर विशाल अगरवालचा पाय खोलात.!

pune porsche accident : बिल्डर विशाल अगरवालचा पाय खोलात.!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एखाद्या अपघात प्रकरणाचा म्हणावा तितका गाजावाजा होत नाही. मात्र, या प्रकरणात अपघात घडल्यापासून विशाल अगरवाल आणि त्याच्या कुटुंबाकडून चुका होत गेल्या. पोलसांना हाताशी धरण्याच्या प्रयत्नापासून ससून रुग्णालयातील डॉक्टरला मॅनेज करण्यात आले. त्यात लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. यामुळे विशाल अगरवाल याच्या चुकीच्या भूमिकेमुळे बिल्डर अगरवालने स्वतःच्याच अडचणीत वाढ केल्याचे आत स्पष्ट झाले आहे.

अशी वाढली गुंतागुंत :  मध्यरात्री अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाचविण्याठी अगरवाल कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलगा महागडी कार चालवत असताना देखील चालक गाडी चालवत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. चालकाला विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी आपल्या बीएमडब्ल्यू गाडीत घालून त्याचे अपहरण करून त्याला बंगल्यात नेले. त्यानंतर त्याचा मोबाईल काढून घेत त्याला गुन्हा अंगावर घेऊन बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपला पती घरी न आल्याने चालकाची पत्नी अगरवाल यांच्या बंगल्यावर गेली. तेथे तिने आरडाओरडा केल्यानंतर अगरवाल यांनी सोडून दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही.

विशाल अगरवाल याने थेट केससाठी महत्त्वाचा ठरणारा अहवालच दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने थेट ससून रिग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचा प्रमुख डॉ. अजय तावरे याला मॅनेज केले. दोन्ही अहवालांमध्ये औंध रुग्णालयात सायंकाळी मुलाचे घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा डीएनए आणि विशाल अगरवाल यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा डीएनए मॅच झाला. मात्र, ससून रुग्णालयाने घेतलेल्या रक्ताचे नमुने मॅच झाले नाहीत. ते नमुने दुसर्‍याचे असल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी गुंतागुंत वाढवून आपल्या अडचणीत वाढ करून घेतली आहे.

गुन्हा वर्ग करण्यास कोर्टाची परवानगी

कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावून मोबाईल काढून घेतल्याच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला वर्ग करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणी यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्यामार्फत न्यायालयात केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्याला आज (दि. 28) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. घटना घडल्यानंतर गुन्हा अंगावर घेण्यासाठी मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि वडील विशाल या दोघांनी चालकावर दबाव टाकला. या पार्श्वभूमीवर चालकावर
गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यास परवानगी देण्याचा अर्ज पोलिसांमार्फत
न्यायालयात करण्यात आला होता.

प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी कारचालकाला बळीचा बकरा बनविण्यासाठी त्याचे कारमधून अपहरण करून त्याचा मोबाईल काढून घेत डांबून ठेवणार्‍या सुरेंद्र अगरवाल याला अटक केली होती. यात आता विशाल अगरवाल याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला सायंकाळी येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर गुन्हा कबूल करण्यासाठी चालकावर दबाव टाकला होता. त्याला गाडीतून बंगल्यावर नेत डांबून ठेवण्यात आले होते. विशालला अटक करून मंगळवारी न्यायालयात
हजर करण्यात येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news