खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी : हडपसर-सासवड रस्त्यावरील चित्र | पुढारी

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी : हडपसर-सासवड रस्त्यावरील चित्र

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हडपसर-सासवड मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने चिखल व राडारोडा तयार झाला आहे. यामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.
उरुळी देवाची फाटा ते फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मंतरवाडी चौकात पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. विठ्ठल पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. पॉवर हाऊस, भेकराईनगर चौकातही लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, दुकानांचे मांडलेले फलक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रस्त्यालगतच अवजड वाहनांचे केलेले अनधिकृत पार्किंग, खरेदीसाठी आलेल्या वाहनचालकांकडून अस्ताव्यस्त लावलेली वाहने, अनधिकृत प्रवासी वाहने, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यातच उभ्या राहणार्‍या बस आदी कारणांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

महापालिकेच्या कचरा डेपोमुळे येथील रहिवाशांनी सुमारे वीस वर्षे यातना भोगल्या आहेत. त्यातच हडपसर-सासवड रस्ता व मंतरवाडी-कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रासही रहिवाशांना सहन करावा लागत आहे. आणखी किती दिवस येथील रहिवाशांनी वनवास सहन करायचा?

– पिंटू हरपळे, रहिवासी, फुरसुंगी

या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ करार होणे बाकी आहे. येत्या पंधरा दिवसांत या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.

– रोहन जगताप, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

हेही वाचा

Back to top button