Malegaon Fire News | धक्कादायक! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार

मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा
मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा – येथील मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा  यांच्यावर रविवारी (दि.२६) मध्यरात्री अज्ञातांकडून अचानक गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत अब्दुल मालिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मालेगाव शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मालिक हे रविवारी (दि.२६) रात्री एक वाजेच्या सुमारास येथील जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात एका दुकानासमोर आपल्या मित्रांसह गप्पा मारत होते. यावेळी अचानक आलेल्या दोघा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी छातीत घुसली असून दुसरी गोळी पायाला लागली आहे. आणखी एक गोळी हाताला स्पर्श करुन गेली आहे.

या गोळीबारात मालिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नाशिकला हलविण्यात आले. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राजकीय किंवा व्यावसायिक वादातून हा गोळीबार झाला असण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. मालिक हे 'एमआयएम'चे नेते युनूस ईसा यांचे सुपुत्र आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर लगेच तेथून निसटून गेले.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

कोण आहेत अब्दुल मलिक?

अब्दुल मलिक माजी महापौर असून सध्या ते एम आय एमचे नगरसेवक आणि मालेगाव महानगर प्रमुख आहेत. मागील १५ वर्षापासून ते नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news