निकालाआधीच आंबेगावात लागले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर | पुढारी

निकालाआधीच आंबेगावात लागले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर

मंचर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालाची तारीख जवळ येत असताना कोणता उमेदवार निवडून येणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिरूरचा निकाल अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच आपल्या नेत्यावर गुलाल उधळला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली असून, येत्या 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, नेत्यांचे समर्थक आपल्या नेत्याचे विजयाचे बॅनर लावताना दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या शिरूर लोकसभा मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. आंबेगाव तालुक्यातील मंचर, पारगाव या गावांमध्ये हे बॅनर झळकत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक झाली. गेल्या वेळी 2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे या वेळी राष्ट्रवादीकडून, तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले डॉ. अमोल कोल्हे हे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात होते.

डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांनी सभांचा फड गाजविला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रचारामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे आढळराव पाटील यांचा विजयाचा फ्लेक्स लावला आहे, तर मंचर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने खासदार कोल्हे यांच्या विजयाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पिंपरी-चिंचवड, भोसरी येथेही डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स झकळले आहेत. त्यामुळे शिरूरमधून नक्की कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

प्रचारात ज्येष्ठ नेते अन् कार्यकर्त्यांच्या निकालाबाबत पैजा

खुद्द शरद पवार व अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरूर मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे शिरूरमध्ये आढळराव पाटील जिंकणार की डॉ. कोल्हे पुन्हा बाजी मारणार, याची उत्सुकता आहे. निवडणुकीच्या निकालास अजून वेळ असला, तरी त्याअगोदरच दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. निकालासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी पैजाही लावल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button