अवैध मद्य विक्री रोखा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी | पुढारी

अवैध मद्य विक्री रोखा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मद्यसेवन परवान्याशिवाय मद्य विक्री करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे 21 वर्षांखालील आणि मद्यसेवन परवाना नसलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करण्याचे प्रकार होणार नाहीत, याकरिता विशेष मोहीम आखून आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 21 वर्षांखालील व्यक्तींना मद्य विक्री करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे अल्पवयीन तसेच मद्यसेवन परवाना नसलेल्यांना मद्य विक्री करता येणार नाही.

याकरिता विशेष मोहीम राबवावी आणि गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करावी. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून, त्याला मद्य पुरविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील तरतुदीखालील विविध नियम, आदेश, अटी, शर्ती यांचा भंग करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करावी. शहरात मद्यालये रात्री दीड वाजेपर्यंत, तर इतर ठिकाणी रात्री 11.30 पर्यंत उघडी ठेवू शकतात. ही वेळेची मर्यादा न पाळणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी. 25 वर्षांपुढील व्यक्तींना मद्यसेवन परवाना देता येतो, तर 21 वर्षे पूर्ण झालेल्यांना सौम्य बिअर किंवा सौम्य मद्यसेवनासाठी विक्री करता येते.

या क्रमांकांवर करा तक्रार

नागरिकांना तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्ष 18002339999 किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8422001133 हा क्रमांक कार्यालये आणि मद्यालयांच्या दर्शनी भागात लावावेत. या माध्यमातून येणार्‍या तक्रारी तत्काळ संबंधित अधीक्षकांना पाठविण्यात येतात. त्यावर योग्य ती कारवाई करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

वारंवार नियमभंग झाल्यास शिस्तभंग

ज्या अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात या घटना आढळून येतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच या नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

सूचनाफलक मद्यालयात लावावा

मद्यसेवन करून जाणारे मद्याच्या अमलाखाली वाहन चालविणार नाहीत, यासाठी आवश्यक सूचनाफलक मद्यालयात लावावा. रूफटॉप हॉटेलमध्ये खुल्या जागेत परवाना नसताना मद्य विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी. दरम्यान, या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय उपायुक्त, अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष मोहीम घ्यावी. या मोहिमांबाबत स्वतंत्र अभिलेख तयार करून जतन करावेत.

हेही वाचा

Back to top button