Pune Car Accident : आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध असेल तर चौकशी होणार : फडणवीस | पुढारी

Pune Car Accident : आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध असेल तर चौकशी होणार : फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध असेल तर त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बुधवारी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे, परंतु त्याविरोधात पोलिसांनी अपील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्यांनाही अटक करण्यात आली असून गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. त्याचा निषेध करतो,” असे फडणवीस म्हणाले.

पोलिसांचे अल्पवयीन आरोपीला समन्स

अपघात झाल्यानंतर नागरिकांनी चोप देत अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या हवाली केले होते. याप्रकरणात मुलावर ३०४ ए नुसार व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला होता. आता पुणे पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला समन्स बजावले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

नेमकी घटना काय?

ही कहानी आहे पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद रईसजाद्याने केलेल्या कृत्याची. वार शनिवार… ठिकाण… कल्याणीनगरचा परिसर! अनिस अवधिया मूळचा मध्यप्रदेशातील पालीचा, तर त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा ही देखील मध्यप्रदेशातील जबलपूरची. दोघेही पेशाने आयटी अभियंता. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे पुण्यात वास्तव्य होते. मात्र, शनिवारची रात्र दोघांसाठीही काळ बनून आली. अनिस आणि मैत्रीण अश्विनी दोघे सॅटर्डेनाईट पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. पार्टी संपल्यानंतर दोघे बाहेर पडले. साधारण मध्यरात्रीचे अडीच वाजले असतील. दोघे दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले होते. इतक्यात कल्याणीनगर जंक्शन चौकात एका भरधाव पोर्शे कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात (Pune Porsche Car Accident) एवढा भयानक होता की, अश्विनी हवेत उडून काही फूट फरफटत गेली. तिचा जागीच मृत्यू झाला, तर अनिस हा देखील गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेथे उपस्थित असलेले काही प्रत्यक्षदर्शी नागरिक या भयानक घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी तत्काळ अपघाताकडे धाव घेत तो रईसजादा आणि त्याच्या मित्रांना पकडून ठेवले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अश्विनी पाहताच त्यांना संताप अनावर झाला. त्यामुळे त्या बेवड्या रईसजाद्याला नागरिकांनी चोप दिला. तसेच त्याची गाडी दगडाने फोडली. पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अल्पवयीन दारुड्या मुलाला ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

Back to top button