तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चौघे गंभीर; कारचा चुराडा | पुढारी

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चौघे गंभीर; कारचा चुराडा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथे भालश्चंद्र कॉलेजसमोर भरधाव जाणारी इंडिका कार, रिक्षा व मातीने भरलेल्या डंपरच्या विचित्र अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. या अपघातात इंडिका कारचा चुराडा झाला, तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहने मंगळवारी (दि. 21) घटनास्थळी पडरून होती. पलटी झालेला माती वाहतूक करणारा डंपर मात्र दुपारी जागेवरून गायब झाला. हा अपघात सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार नीलेश राणे म्हणाले, अपघाताबाबत कोणतीही तक्रार दाखल नाही. पानशेत येथून मातीने भरलेला डंपर खानापूर येथील तीव— उताराच्या रस्त्यावरून पुण्याकडे भरधाव जात होता. त्याचवेळी पुण्याकडून खानापूर-सांबरेवाडीकडे (ता. हवेली) एक रिक्षा चालली होती. समोर आलेल्या रिक्षाला चुकवताना इंडिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून कारचा चुराडा झाला, तर रिक्षा भरधाव पुढे गेली. या वेळी कारला चुकवताना मातीचा डंपर गटारात जाऊन पलटी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार व रिक्षामधील जखमींना तातडीने उपचारांसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केली नसल्याने जखमींची नावे समजू शकली नाहीत.

हेही वाचा 

Back to top button