जलसंकट ! उन्हाच्या वाढत्या पार्‍यासोबतच टँकरची मागणी वाढली

जलसंकट ! उन्हाच्या वाढत्या पार्‍यासोबतच टँकरची मागणी वाढली

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांत शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. अनेक नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळेच आजअखेर आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांत तब्बल 69 टँकर सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत ट्रँकरग्रस्त गावांमध्ये विविध पाणीयोजना व उपाययोजना राबविण्यात आल्या. पण यंदा बहुतेक विहिरी, कूपनलिका आदी पिण्याचे पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत टँकरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात शेकडो गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण होत असे. यामुळे जिल्ह्यातील लाखो लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षांत अशा सर्व टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या गावांवर विशेष लक्ष देण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजना या गावांसाठी राबविण्यात आल्या. एवढेच नाही, तर ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याची काहीच साधने नाही अशा ठिकाणी पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत मुरविण्यासाठी टंचाई आराखड्यात विशेष प्रयत्न करण्यात आले. जलयुक्त शिवार योजना, जलजीवन मिशन, विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविण्यात आले. याचा परिणाम गावांची पाणीटंचाई दूर झाली खरी, पण यंदा पाणी योजनांचे मुख्य स्रोतच आटून गेल्याने पाणीसाठा कमी झाला आणि टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील उन्हाचा पार 40 पारच राहिला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यासह पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. यामुळेच सध्या पाणी टंचाईचे संकट अधिकच गंभीर होऊ लागले आहे.

1 लाख 16 हजार लोकांना पाणीटुंचाईचा बसला फटका

यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतदेखील पाऊस कमी झाला. ऐन पावसाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. परंतु धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होऊन धरणे 100 टक्के भरल्याने आतापर्यंत गंभीर पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु आता मे महिना सुरू होताच टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. तब्बल 1 लाख 16 हजार लोकांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. आजअखेर सर्वाधिक टँकर 23 आंबेगाव तालुक्यात, शिरूरमध्ये 12 टँकर, जुन्नर 20 आणि खेडमध्ये 14 टँकर सुरू आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाईची स्थिती

तालुका              टँकर                बाधित लोकसंख्या

  • आंबेगाव            23                    40152
  • जुन्नर                 20                   23473
  • खेड                 14                    28886
  • शिरूर             12                    22829
  • एकूण               69                   116739

गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर पूर्णपणे आटली आहे. हातापंपावर पाण्यासाठी नंबर लावावा लागतो. एखादा हंडा पाणी मिळते, कपडे धुण्यासाठी देखील पाणी नाही.
नळपाणी योजना येणार, असे गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय; पण पाण्यासाठीची आमची वणवण अद्याप काही थांबली नाही.

– नंदा सोपान बारवेकर, मंदोशी, ता. खेड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news