12 th result | दिवसभर नोकरी करून त्यांचे बारावीत घवघवीत यश..! | पुढारी

12 th result | दिवसभर नोकरी करून त्यांचे बारावीत घवघवीत यश..!

पुणे : मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचा रहिवासी आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून आईसह पुण्यात वास्तव्यास आहे. वडील मुंबई येथे मंडप डेकोरेशनचे काम करतात. सकाळी साडेसात ते सायंंकाळी पाच या वेळेत मी हॉटेलमध्ये काम करतो. त्यानंतर रात्री पूना नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. भविष्यात शिक्षण पूर्ण करून बँकिंग, फायनान्समध्ये काम करण्याचे ध्येय आहे… असे प्रशांतजित सोनू बेंडल सांगत होता.

बारावीचा निकाल मंगळवारी (दि. 21) जाहीर झाला. त्यात प्रशांतजित याच्याप्रमाणे विविध रात्र प्रशालांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनीही बाजी मारली. कोणी कपड्यांच्या दुकानात नोकरी करीत, कोणी पेट्रोल पंपावर काम करीत बारावीची परीक्षा दिली आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या मेहनती विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून, मुलांच्या या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. त्यामुळे त्यांच्या यशावर आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

पूना नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधून 80 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. महाविद्यालयाचा निकाल 97.50 टक्के लागला आहे. महाविद्यालयात प्रशांतजित सोनू बेंडल याने 78.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोमल राजू किरवे हिने 76.67 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि राजेश तानाजी बेंडल याने 72.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाहन वितरण (शोरूम) कार्यालयात काम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास करून कोमल राजू किरवे या विद्यार्थिनीने रात्र प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिला 76.67 टक्के गुण मिळाले आहेत.

तिने नोकरी करून हे यश संपादित केले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 95.00 टक्के लागला आहे. महाविद्यालयात सुजाता चव्हाण हिने 66.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मंजुळा कांबळे हिने 64.83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि नयना वानकडे हिने 63.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

हेही वाचा

Back to top button