राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवून बदनामी : आमदार टिंगरे

राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवून बदनामी : आमदार टिंगरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेत आरोपीला वाचविण्यासाठी मी पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही. मात्र, राजकीय हेतूने माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती पसरविली जात आहे. चौकशीत सर्व वस्तुस्थिती समोर येईल, अशी स्पष्टोक्ती आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, प्रत्यक्षात रविवारी पहाटे माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली.

त्याचवेळी विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्याला नागरिकांनी मारहाण केली असल्याचे सांगितले, ही माहिती समजल्यानंतर मी प्रथमत: घटनास्थळी आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिस निरीक्षकांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मला खरी वस्तुस्थिती समजली. त्यानुसार आपण दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन पोलिस ठाण्यातून बाहेर पडलो.

'नाइट लाइफ'विरोधात आवाज उठविला

माझ्या मतदारसंघातील कल्याणीनगर, विमाननगर भागातील पब, हॉटेल्स, हुक्का पार्लर या नाईट लाईफच्या विरोधात मी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविला होता. त्याचबरोबर गतवर्षी कल्याणीनगर भागातील नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल येथील रहिवाशांसमवेत तत्कालीन पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची भेट घेऊन हॉटेल्स, पबवर कारवाईची मागणी केली होती. नाइट लाइफला माझा विरोध होता आणि तो कायम असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news