12 th result | कचरावेचकांच्या मुलांची बारावीत यशस्वी भरारी..! | पुढारी

12 th result | कचरावेचकांच्या मुलांची बारावीत यशस्वी भरारी..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कष्ट करणार्‍या आई-वडिलांचे स्वप्न होते मुलांनी शिकावे; याच स्वप्नासाठी मुलांनीही दिवस-रात्र मेहनत केली आणि कचरावेचक, स्वच्छता कर्मचार्‍यांच्या मुलांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. कोणी नोकरी करून, तर कोणी आई-वडिलांच्या कामाला हातभार लावून बारावीची परीक्षा दिली आणि त्यांच्या याच कष्टाने त्यांना यशाचे पंख दिले आहेत. आता पुढील शिक्षणासाठी मोठी मेहनत घेणार असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कचरा वेचणार्‍या आई-वडिलांच्या कष्टाचे मुलांनी चीज केले असून, मुलांच्या यशाच्या आनंदाने आई- वडिलांचेही डोळे पाणावले.

मिठाई अन् शुभेच्छांचा वर्षाव कष्टकर्‍यांच्या मुलांवरही होत आहे. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीतील या मुलांनी मेहनत केली, तर यश नक्कीच मिळते, हे दाखवून दिले आहे. बारावीच्या परीक्षेत करिना जैस्वाल हिने 83.67 टक्के (वाणिज्य शाखा), प्रतीक्षा पिंगळे हिने 77.03 टक्के (कला शाखा), मेघना मोरे हिने 75.06 टक्के (वाणिज्य शाखा), अंकित पंडित याने 75.00 टक्के (कला शाखा), मेघना बुरंगे हिने 60.83 टक्के (कला शाखा) गुण मिळविले. बारावीत 83.67 टक्के गुणे मिळविणार्‍या करिना हिने अभ्यासासाठी खूप मेहनत घेतली. करिनाची आई शकुंतलाबाई पिंपरी-चिंचवडमध्ये घंटागाडीवर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत आहेत. तिच्या वडिलांचे 2012 मध्ये निधन झाले. तिची मोठी बहीण नेहा टाटा मोटर्समध्ये गुणवत्ता विभागाच्या असेंब्ली लाइनवर काम करते.

आपल्या यशाबद्दल करिना म्हणते, माझ्या यशाबद्दल मी समाधानी आहे आणि आनंदीही आहे. आईच्या कष्टाचे चीज झाले आहे. आईने मला शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी पहाटे तीनपर्यंत अभ्यास करायचे. मी कोणत्याही विषयासाठी शिकवणी लावली नाही, तर स्वतः अभ्यास केला. अभ्यास केल्यामुळे हे यश मिळवू शकले. पुढे मला बीबीए करायचे आहे. मेघना मोरे हिने 75.06 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना दिले आहे. मेघना म्हणाली, मला कंपनी सेक्रेटरी म्हणून भविष्यात काम करायचे आहे. मी हे स्वप्न पाहत आहे आणि त्यासाठी कष्टही करत आहे. माझे वडील घराघरांमध्ये जाऊन कचरा गोळा करतात, कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीमुळे आणि पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले.

माझे वडील आधारस्तंभ आहेत. खूप अभ्यास केला आणि हे यश मिळाले. अंकित पंडित याने 75.00 टक्के गुण मिळवले असून, सैन्यदलात काम करण्याचे स्वप्न असल्याचे अंकित सांगतो. अंकित हा योगप्रेमी आहे आणि त्याने राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. त्याने नुकतीच सैन्यदलाची परीक्षा दिली आहे आणि त्याचाही पुढील 3-4 दिवसांत निकाल येण्याची वाट पाहत आहे. माझी बहीण गेल्या महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाली आणि माझे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे आहे. माझी आई ज्योती पंडित ही स्वच्छ सहकारी संस्थेच्या सदस्य आहे आणि वानवडी परिसरात कचरा गोळा करते. तिच्या पाठिंब्यामुळेच मी यश मिळवू शकलो, असे अंकितने सांगितले.

हेही वाचा

Back to top button