Porsche Car Accident : सीसीटीव्ही फुटेज अन्.. मोठी माहिती समोर

Porsche Car Accident : सीसीटीव्ही फुटेज अन्.. मोठी माहिती समोर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी हॉटेल कोझी व ब्लॅक क्लब येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. मात्र, हॉटेलमधून जप्त करण्यात आलेले फुटेज व आरोपींकडून तपासादरम्यान देण्यात आलेली माहिती यांमध्ये मोठी तफावत असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (दि. 21) न्यायालयात दिली. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेल कोझीचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय 25, रा. ए 7, पद्म विलास इन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय 35, रा. साईसदन ए 2, तुकाईदर्शन, हडपसर), सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय 35, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. 107, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) यास पोलिसांनी अटक करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या गोष्टींची होणार चौकशी

  • हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आलेल्यांकडे दारू पिण्याच्या परवान्याबाबत काय खात्री केली?
  • आरोपींनी अल्पवयीन मुलास कोणत्या क्लब मेंबरर्सच्या नावाने क्लबमध्ये प्रवेश दिला?
  • अल्पवयीनसह त्याच्या मित्राला मद्य पुरविल्यानंतर दिलेले बिल व केलेल्या पेमेंटचा तपशील.
  • हॉटेल व क्लबचे परवाने, क्लब सभासदांच्या नावांची माहिती घेऊन

मुलाविरुद्ध गुन्हा; पोलिसांकडून कलमवाढ

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाविरुद्ध मद्य पिऊन मोटार चालविल्याप्रकरणी कलम वाढ करण्यात आली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी येरवडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भादंवि 304), तसेच 304 (अ), 279, 337, 338, 427 आणि मोटार वाहन अधिनियम 1988 च्या 184, 119 आणि 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन मोटार चालविल्याप्रकरणी पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमातील कलम 185 नुसार गुन्हा दाखल केला. कलमवाढ केल्याने अल्पवयीन मुलाला पुन्हा बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, तपासणीसाठी ससून रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

ब्लॅक क्लबचा व्यवस्थापक फरार

गुन्ह्यातील आरोपी ब्लॅक क्लबचा व्यवस्थापक जयश बोनकर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाण्यासह संपर्क क्रमांकाबाबत क्ल्बचा सहव्यवस्थापक असलेल्या संदीप सांगळे यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.

हॉटेल व्यवस्थापनाकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष

  • व्यवस्थापनाने हॉटेलमध्ये प्रवेश देताना वयाची विचारपूस केली नाही
  • क्लबचे सदस्य नसताना क्लबमध्ये प्रवेश देण्यात आला
  • अल्पवयीनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे फलक लावण्याकडे दुर्लक्ष

हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा यांना नोटीस

या प्रकरणात हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद बद्रिनारायण भुतडा (वय 58) यांकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. या वेळी त्यांनी मुलगा नमन भुतडा व मॅनेजर सचिन काटकर हे प्रत्यक्षात हॉटेलचे व्यवस्थापन पाहत असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रल्हाद भुतडा यांना सीआरपीसी कलम 41 (अ) (1) नुसार नोटीस देऊन तपास कामासाठी बोलावण्यात येईल तेव्हा हजर राहण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आले.

तिघांची 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री न करता त्यांना मद्य पुरविण्यात आले. याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करून ते रेकॉर्ड तपासासाठी जप्त करायचे आहे, अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये मद्य पिण्याची मुभा व परवानगी देण्यामध्ये दोन्ही हॉटेलमालकांचा काय सहभाग आहे, हॉटेलचे प्रत्यक्ष व्यवस्थापन कोण पाहते, त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का, यांविषयी त्यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. याखेरीज, हॉटेलच्या दर्शनी भागात बाल न्याय अधिनियम कलम 77 प्रमाणे नोटीस लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामध्ये हॉटेलचे मुख्य मालक व इतर व्यवस्थापन पाहणारे मॅनेजर यांचा सहभाग आहे का, या दृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विद्या विभुते व योगोश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली.

हे प्रकरण गंभीर; न्यायालयाने सुनावले

कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. मुलाला मद्यविक्रीप्रकरणी हॉटेलमालकासह व्यवस्थापाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटना वेगळ्या आहेत, स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. मुळात हे प्रकरण गंभीर आहे. अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्यविक्री करण्यात येत आहे. मद्य प्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविल्याने निष्पांपाचे बळी गेले, अशा शब्दांत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news