गुलटेकडी परिसरात ड्रेनेज लाइन तुंबल्याने घरांत सांडपाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

गुलटेकडी परिसरात ड्रेनेज लाइन तुंबल्याने घरांत सांडपाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महर्षीनगर  : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी परिसरातील बिलाल मशिदीसमोरील  वसाहतीत मुख्य ड्रेनेज लाइन तुंबल्याने  नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. यामुळे  दुर्गंधी पसरल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने  संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी मोरीमधून ड्रेनेजचे पाणी घरात शिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गुलटेकडी वसाहत परिसरात ड्रेनेजची समस्या नवीन नाही. नागरी वस्तीच्या तुलनेत ड्रेनेज लाइन लहान व जुनी असल्याने या ठिकाणी ही समस्या वारंवार उद्भवत आहे. झोपडपट्टी परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
अवकाळी पावसामुळे तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी परिसरातील रहिवाशांच्या घरात शिरत आहे. मोरी व स्वच्छतागृहांतून हे पाणी आत येत आहे. यामुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी कधीही मोरीमधून ड्रेनेजचे पाणी घरात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बिलाल मशीदसमोरील वसाहतीत  मुझफ्फर शेख, छाया सपकाळ, जन्नत सपकाल, आयशा हन्नुरे, रेहाना काझी, सलमा शेख, रफिक पिंजारे, बिस्मिला शेख, जाफर बागी, इरफान आलोरा, आलास मन्सुरी, नबिला अन्सारी, नसीर अन्सारी, सुलताना शेख, हजरा शेख या नागरिकांना या समस्येचा सामाना करावा  लागत आहे.
ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनसुद्धा बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडवल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब अटल यांनी दिला आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी निष्क्रिय आहेत. वसाहतीच्या अनेक नागरी समस्या असूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही  त्यांनी सांगितले.
नागरी वस्तीच्या तुलनेत या ठिकाणी असलेल्या ड्रेनेज लाइनची क्षमता अपुरी पडत असल्याने ती तुंबली आहे. या ठिकाणी नवीन लाइन टाकणे आवश्यक आहे. या वाहिनीची तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
-प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.
परिसरात नवीन ड्रेनेज लाइन टाकल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. क्षमतेपेक्षा वाहिनी लहान असल्याने ही समस्या उद्भवत आहे. बिलाल मशीद परिसरात नवीन ड्रेनेज वाहिनी टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले होते. परंतु, काही स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला होता.
– शुभम बाबर, कनिष्ठ अभियंता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button