इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि. २१) सायंकाळी वादळ वाऱ्यामध्ये कुगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रवासी वाहतूक करणारे बोट ऐतिहासिक इनामदार वाड्याच्या नजीक बुडाली. यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे जीवाच्या आकांताने पोहत नदीकाठी आले. मात्र ते गाळात रुतून बसले त्यांना स्थानिक मच्छीमार व होडी चालकांनी बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र उर्वरित सहा जण बेपत्ताच होते. त्यांचा शोध एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिक करीत असताना आज गुरुवारी (दि. २३) सकाळी साडेदहापर्यंत सर्व सहा मृतदेह सापडले.
यामध्ये एकाच कुटुंबातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०व), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड) आणि माही गोकूळ जाधव (वय ३ वर्षे, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. तरअनुराग उर्फ गोल्या ज्ञानदेव अवघडे (वय २०) व गौरव धनंजय डोंगरे (वय २५) यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
मंगळवारी रात्री पावसामुळे व वादळामुळे या परिसरात अतोनात नुकसान झाले. नदीला जाण्यासाठीच्या रस्त्यावर पडलेली झाडे, विद्युत खांब, चिखल, गायब झालेली वीज यामुळे शोध कार्यात अनेक अडथळे येत होते. एनडीआरएफच्या २० जवानांचे पथकाने बुधवारी (दि. २२) सकाळी ७ वाजता शोध मोहिमेला सुरुवात केली. दिवसभर शोध घेतला; मात्र त्यांना त्यांच्या तपासाला यश आले नाही. एक दुचाकी फक्त पाण्याबाहेर काढण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून पुन्हा एनडीआरएफचे जवान या कामाला तैनात झाले. अगोदर तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांना बाहेर काढल्यानंतर दोघांचा मृतदेहही सापडले. या सर्वांना नदीच्या पलीकडच्या काठावर कुगाव (ता. करमाळा) गावच्या हद्दीत रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.
कुगाव गावातील दोन युवक आणि झरे गावातील संपूर्ण कुटुंबच बोट पलटी झाल्याने मरण पावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा टाहो उपस्थितांचा हृदय पिळवटून टाकत होता. इंदापूर तालुक्यातील कळाशी गाव देखील पुरता हळहळ व्यक्त करत आहे.
पुणे -सोलापूरला जोडणारा पूल जरी मंजूर झाला असला तरी तो पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. करमाळा तालुक्यातील अनेक जण या मोठ्या लॉन्स म्हणजे प्रवासी बोटीचाच वापर इंदापूर शहरांमध्ये येण्यासाठी करतात. दिवसभरात या बोटीचे अनेक हेलपाटे होत असतात. पडस्थळ, कळाशी, गंगावळण, शिरसोडी या गावांमधून या बोटी भीमा नदीतून प्रवाशांना ने-आण करत असतात. यावेळी कोणतीही सुरक्षितता पाळली जात नाही. अंगात सुरक्षिततेसाठी जॅकेट, हवेची ट्यूब, दोरखंड, बोटीतील पाणी बाहेर काढण्यासाठी साहित्य या कोणत्याही साहित्यांचा वापर न करता हा प्रवास सुरू असतो. यावर आता प्रशासनाने करडी नजर ठेवून उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा अशा घटना वारंवार घडतच राहतील.
हेही वाचा