Loksabha election | पुण्यातील मुस्लिम धर्मगुरूंचा एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंना जाहीर पाठिंबा | पुढारी

Loksabha election | पुण्यातील मुस्लिम धर्मगुरूंचा एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंना जाहीर पाठिंबा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणुका जाहीर झाल्यापासून पुण्यातील विविध मशिदींमधील मेंबर्सकडून विविध मुस्लिम बांधवांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांतील हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे. पुण्यातील धर्मगुरूंनी यावर आक्षेप घेतला आहे. मशिदींमधून याप्रकारे कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे. मतदारांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यास हरकत नाही. मात्र, कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला धार्मिकस्थळांमार्फत आवाहन करणे चुकीचे आहे, असे मत आयोजित पत्रकार परिषदेत धर्मगुरूंनी मांडले. या वेळी मौलाना हैदर खान, मौलाना शकील शेख, मौलना हाफिज नसीम हे धर्मगुरू उपस्थित होते.

ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे, त्यांनी बाबरी मशीद पाडणार्‍या कारसेवकांचा सन्मान केला आहे. तसेच, काँग्रेसच्या उमेदवाराने वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून त्यावर बांधकाम सुरू केले, मात्र आम्ही सर्व मुस्लिम बांधव अनिस सुंडके यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांनाच मतदान करण्याचे आवाहन आम्ही मुस्लिम बांधवांना करणार आहोत. कारण वक्फ बोर्डाच्या जागेची माहिती मिळताच सुंडकेसाहेबांनी त्याची शहनिशा करून त्यावर कायदेशीररीत्या स्टे आणला, असेही ते पुढे म्हणाले. उपस्थित धर्मगुरूंनी एमआयएम पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिस सुंडके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button