आता डमी परीक्षार्थींना बसणार चाप! ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत आमूलाग्र बदल | पुढारी

आता डमी परीक्षार्थींना बसणार चाप! ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत आमूलाग्र बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर 2023 व त्यापूर्वी झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये काही परीक्षा केंद्रांवर डमी उमेदवार बसवणे, या डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने पावले उचलली असून ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत परिषदेकडून आमूलाग्र बदल केले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

डॉ. बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये यासाठी, पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येत असून जून 2024 मध्ये होणार्‍या इंग्रजी/ मराठी / हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये, सर्वांत पहिले पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच 7 मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. सुरुवातीलाच स्पीड पॅसेजचाचा प्रश्न दिल्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना पॅसेज सोडविण्याची प्रॅक्टिस होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या 15 मिनिटांमध्ये 3 मिनिटांचा सराव उतारा सोडविण्याकरिता देण्यात येणार आहे.

या ट्रायल पॅसेजला कोणत्याही प्रकारचे गुण देण्यात येणार नाही. तथापि विद्यार्थ्यांना मात्र 3 मिनिटांचा सराव उतारा सोडविणे बंधनकारक राहील. या माध्यमातून संगणकावरील कीबोर्डची चाचणीदेखील विद्यार्थ्यांना आपोआपच होईल. लॉगिन होण्यापूर्वी हा ट्रायल पॅसेज देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून लॉगिन झाल्यानंतर लगेचच 5 मिनिटांचा ई-मेलचा प्रश्न उपलब्ध करून देण्यात येईल. हा ई-मेलचा प्रश्न निर्धारित वेळेनंतरच म्हणजे पूर्ण 5 मिनिटे झाल्यावरच अ‍ॅटो सबमीट होणार आहे. गती उतारा संपल्यानंतर स्टेटमेंट, लेटर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अशा क्रमाने प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

इंग्रजी/मराठी/हिंदी 30 व 40 शब्द प्रतिमिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये यापुढे ईमेलच्या प्रश्नाला असलेल्या आठ मिनिटांचा वेळ कमी करण्यात येत असून आता ईमेल प्रश्नासाठी 5 मिनिटे देण्यात येणार आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 3 मिनिटे आधी ट्रायल पॅसेजची लिंक बंद करण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यापासून 5 मिनिटानंतर कुणालाही परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. हा मुद्दा सर्व संस्थाचालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगायचा आहे. या सत्रापासून एकाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी 30, 40 शब्द प्रतिमिनिट टंकलेखनाचे अर्ज केले असतील तर त्यांना दोन्ही विषय मिळून एकच प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. मात्र इंग्रजी व मराठीचे परीक्षा केंद्र हे साधारणपणे वेगवेगळे असल्यामुळे इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी वेगवेगळे प्रवेश पत्र देण्यात येणार असल्याचे देखील डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button