सीए परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच! | पुढारी

सीए परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.  निवडणुकीच्या दिवसांमध्ये परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासातील अडचणी, मतदान केंद्रांजवळ जास्त गर्दी आणि सुरक्षा समस्या, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.
यावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की,  विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार मतदानाचे नियोजन करावे. आयसीएआयने अशा परिस्थितींसाठी उपाय आणि साहाय्य करण्यासाठी आधीच व्यवस्था केली आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, आयसीएआयने नुकतीच एक नवीन घोषणा केली आहे की, आत्तापासून सीए फाउंडेशन आणि सीए इंटर परीक्षा दरवर्षी तीनवेळा घेतल्या जातील. यापूर्वी या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात होत्या. आयसीएआयचे सदस्य धीरज खंडेलवाल यांनी ही माहिती दिली.

अशा आहेत परीक्षेच्या तारखा

  • सीए इंटर गट एकच्या परीक्षा 3, 5 आणि 9 मे 2024 रोजी होणार आहेत.
  • सीए इंटर गट दोनच्या परीक्षा 11, 15 आणि 17 मे 2024 रोजी होणार आहेत.
  • याशिवाय सीएच्या अंतिम परीक्षाही दोन गटांत घेतल्या जाणार आहेत.
  • गट 1 ची अंतिम परीक्षा 2, 4 आणि 8 मे 2024 रोजी होणार आहे.
  • गट 2 ची अंतिम परीक्षा 10, 14 आणि 16 मे 2024 रोजी होणार आहे.
  • यासोबतच 14 आणि 16 मे 2024 रोजी इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट देखील घेतली जाईल.

हेही वाचा

Back to top button