नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कांदा निर्यातबंदी उठवण्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही गुजरातच्या २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतला. बांगलादेश, श्रीलंका, भुतानला कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचा जुनाच आदेश दाखवत महाराष्ट्राची फसवणूक केली. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या भाजपला केंद्रातील सत्तेतून हाकलून लावा, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला. गुजरातेतील कांदा निर्यातीचा धोरणात्मक निर्णय घेऊन केंद्र सरकारने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडीने सोमवारी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज भरले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधात जोरदार आसूड ओढले.
जयंत पाटील म्हणाले की, देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र, येथील कांदा उत्पादक केंद्र सरकारला दिसला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीची अनेकदा मागणी करूनही केंद्र सरकारने ती मान्य केली नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असतानादेखील गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. विशेष म्हणजे, गुजरातच्या या कांदा निर्यातीला मुंबईच्या जेएनपीटी बंदराचे दार खुली करून देत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली आहे. या विरोधात शेतकरी संताप व्यक्त करीत असताना सरकारने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मॉरिशस या देशांमध्ये कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे जुनेच आदेश नव्याने जाहीर करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ट्विटरद्वारे पंतप्रधानांचे आभार मानत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी काम करतात की गुजरातसाठी?, महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे शेतकरी तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का?, अशा शब्दांत पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र डागले. केवळ कांदा उत्पादकच नव्हे तर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनादेखील या सरकारने नाडले आहे. या अन्यायकारी महायुतीला सत्तेतून हाकलून लावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
गावितांना मत खाण्याचे कॉन्ट्रॅक्ट!
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडीसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या जे. पी. गावित यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं खाण्यासाठी भाजपने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यामुळे आपले मत वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या, असे आवाहन करत महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रचारपत्रकावर गावित यांनी विनापरवाना फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल पाटील यांनी निषेध नोंदविला.
हुकूमशाही नष्ट करण्यासाठी पुढे या!
संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारकडून केला जात आहे. लोकशाही संपवून टाकण्याचा घाट भाजपने रचला आहे. भाजपची हुकूमशाही नष्ट करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे. या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी पाठवा, असे आवाहन करत लोकशाही वाचविण्यासाठी जागते रहो जाणारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.
आता विजयी रॅली काढू!
केंद्रातील अन्यायकारी भाजपप्रणीत सरकारला लोक वैतागले आहेत. आता त्यांना बदल हवा आहे. केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार येणार आहे, महाराष्ट्रातही आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा करत येत्या चार जूनला विजयी रॅली काढली जाईल, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा –