पुणे: कृषीपंपाची वीज तोडल्यास याद राखा; येडगाव परिसरातील शेतकरी आक्रमक | पुढारी

पुणे: कृषीपंपाची वीज तोडल्यास याद राखा; येडगाव परिसरातील शेतकरी आक्रमक

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : आमच्या हक्काचे व आम्हाला पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून इतर कुठे पाणी न्यायचे असेल तर आमची हरकत नाही. परंतु, पुन्हा विजेचे कनेक्शन बंद करून आमच्या हक्काचे पाणी पळवणार असाल तर याद राखा, असा इशारा येडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच मंगळवारी (दि.३०) जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

येडगाव धरणातील पाणी शिरूर नगरपरिषद हद्दीतील बंधाऱ्यात सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने येडगाव धरण परिसर व कुकडी नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सुमारे पाच हजार कृषी पंपाचे कनेक्शन तोडले होते. शेतकरी आक्रमक झाल्याने व आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी केल्याने तसेच खासदार अमोल कोल्हे यांनीही शेतकऱ्यांना धीर दिल्याने जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन पुन्हा जोडून दिले. मात्र, येत्या तीन-चार दिवसात पुन्हा वीज कनेक्शन तोडावे लागेल असे सांगितल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२९) येडगाव येथे बैठक घेतली. आमच्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे. जलसंपदा विभाग या संदर्भामध्ये नेमका काय निर्णय घेणार? याचा जाब विचारण्यासाठी येडगाव व उंब्रज परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती येडगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबाजीशेठ नेहरकर यांनी या वेळी दिली. दरम्यान, जलसंपदा विभागाचा हा निर्णय जुलमी व शेतकरीविरोधात असून यापुढे शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी दिला आहे.

 सत्यशिल शेरकर यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्याला विरोध दर्शवला आहे. यापुढे येडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडू देणार नाही. जलसंपदा विभागाने तसा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सध्या उन्हाळा कडक असल्याने शेती पिकांना दिवसाड पाणी द्यावे लागत आहे. एकाही शेतकऱ्याचे विजेचे कनेक्शन न तोडता शिरूरसाठी पाणी न्यावे. जुलै अखेरपर्यंत जुन्नर तालुक्यातील धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. तसेच शेतीला देखील पाणी कमी पडणार नाही, याचे नियोजन केले आहे.

– अतुल बेनके, आमदार

हेही वाचा 

Back to top button