पुणे; पुढारी वृत्तसेवा : कृषी आयुक्तालयातील सेवानिवृत्त तंत्र अधिकारी आणि निर्यात कक्षाचे प्रमुख गोविंद गंगाराम हांडे (६२) यांचे रविवारी दुपारी रहात्या घरी हृदयविकाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी कीटकशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी पर्यतचे शिक्षण घेतले. नांदेड जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव अजनी (ता.बिलोली) हे आहे. हांडे हे १९८४ मध्ये कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले. १९८४ ते २००० पर्यत पुण्यातील गुणनियंत्रण शाखेची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर जवळपास १८ वर्ष कृषी मालाच्या निर्यातीसाठी फायटो सॅनेटरी व निर्यात संदर्भामध्ये त्यांचे यशस्वी योगदान राहिले. त्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व इतर अनेक फलोत्पादन संघांकडून त्यांना कृषी निर्यातीतील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे.
कृषी निर्याती संदर्भात त्यांनी विविध वृत्तपत्रे, कृषी विभागाच्या शेतकरी मासिकामधून सातत्याने लिखाण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांची या संदर्भात विविध पुस्तके प्रकाशित झाली. महाराष्ट्र शासनाच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सन २०१८ मध्ये ते कृषी विभागातून तंत्र अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले व त्यानंतर देखील कृषी निर्यातीच्या संदर्भात ते महत्त्वपूर्ण योगदान देत राहिले. केंद्र सरकारच्या अपेडा संस्था आणि शेतमाल निर्यातीसाठी विकसित करण्यात आलेल्या ग्रेपनेट अनारनेट, व्हेजनेट, मँगोनेट आदीच्या बागा नोंदणी ते शेतमाल निर्यातीतील सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यामध्ये आणि कृषी निर्यातीमध्ये सुसूत्रता आणण्यामध्ये यांचा भरीव वाटा होता. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. त्यांच्या निधनाने कृषी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.