पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात उष्णतेची लाट; महापालिका, ग्रामपंचायतींना सावधानतेचा इशारा | पुढारी

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात उष्णतेची लाट; महापालिका, ग्रामपंचायतींना सावधानतेचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावधान ! आजपासून सात दिवस शहरांत उष्णतेची लाट अतितीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवार उष्ण झळांचा ठरला. उन्हाचा तडाखा इतका होता की पुणेकरांनी कुलरसमोर बसूनच घालवणे पसंत केले.
शिवाजीनगर 41, तर कोरेगाव पार्क, चिंचवडचा पारा 43 अंशांवर गेला होता. यंदा मार्चपासूनच शहरातील कमाल तापमान टिपेला आहे. एप्रिलमध्ये ही लाट अधिक तीव्र झाली. आता शेवटच्या आठवड्यात तर अतितीव्र लाट सक्रिय होत आहे. 29 एप्रिलपासून या लाटेला प्रारंभ होत असून, 5 मे पर्यंत ही लाट सक्रिय राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. रविवारी त्याची झलक दिसली. शहरातील सर्वच भागात उष्ण वारे दिवसभर वाहत होते. त्यामुळे घरात बसूनही असह्य उकाडा जाणवत होता.

जिल्हा प्रशासनाच्या काय आहेत सूचना?

  • रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय करा
  • या ठिकाणी पुरेसे पंखे, कुलर यांचीही व्यवस्था करावी.
  • उष्माघाताची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथक तैनात ठेवा
  • बाजार, मॉल्स या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
  • सार्वजनिक उद्याने दुपारी 12 ते 4 खुली ठेवावीत.
  • आरोग्य केंद्रात उष्णतेच्या लाटेची माहिती लावा.
  • विद्यार्थांनी शारीरिक हालचाली कमी कराव्यात. मैदानावरील व्यायाम कमी करावेत. दुपारी 1 ते 4 व्यायाम टाळावा.
  • महाविद्यालयांनी पंखे, कुलर सुरू आहेत का, याची खात्री करूनच परीक्षा घ्याव्यात.
  • सर्वच कामाच्या ठिकाणी गार पाण्याची व्यवस्था आहे का, याची खात्री करा.
  • बांधकामाच्या ठिकाणी पाणी आणि प्रथमोपचार किट ठेवा.

हेही वाचा

Back to top button