बारामतीत उद्योगांना पोषक वातावरण कोणी निर्माण केले? : अजित पवार यांचा सवाल | पुढारी

बारामतीत उद्योगांना पोषक वातावरण कोणी निर्माण केले? : अजित पवार यांचा सवाल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यांतील ओद्योगिक वसाहतींमध्ये आणखी काही मोठे उद्योग यावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बारामती एमआयडीसी कोणी आणली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एमआयडीसी जरूर कोणीही आणू द्या, पण इथे उद्योगधंद्याला पोषक वातावरण निर्माण कोणी केले, आलेले उद्योग वाढतील याकडे लक्ष कोणी दिले, हे समस्त बारामतीकरांना माहिती आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत कामगार संवाद मेळावा पार पडला, या वेळी ते बोलत होते. वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, केशव घोळवे, पोपटराव गावडे, संभाजी होळकर, किरण गुजर, सचिन सातव, मदनराव देवकाते, गोविंद देवकाते आदींची उपस्थिती होती.

पवार म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे. आजवर अनेक पंतप्रधान देशाने पाहिले, परंतु जनतेशी कायम हितगूज साधणारे, कामगार, शेतकरी यांचे प्रश्न समजून घेणारे, देशात कुठे कोण चांगले काही करत असेल तर जाहीरपणे त्याची माहिती इतरांना देत प्रेरित करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. आजवर इतरांवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु मोदींवर एकही शिंतोडा उडालेला नाही. राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स घोटाळा घडला होता, ते नाव सर्वसामान्यांच्याही तोंडी असायचे. देशामध्ये 543 खासदारांव्यतिरिक्त आता 181 महिलांची भर पडणार आहे. राज्याचा विचार करता 288 व्यतिरिक्त 96 महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. महिलांना सन्मान देण्याचे हे काम एनडीएच करू शकते.

यूपीएची दहा वर्षे सत्ता असताना सोनिया गांधी यांनाही ते जमले नाही, असे सांगून पवार म्हणाले, पारदर्शक कारभाराला महत्त्व देण्याची गरज आहे. बारामतीत दबावाचे राजकारण केले जात आहे, दमदाटी केली जात आहे, बदल्या केल्या जात आहेत, अमक्याची चिठ्ठी आण मगच कामावर घेऊ असे सांगितले जात आहे, असा आरोप करून पवार म्हणाले, मी कधी सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. कोणाला हिणवले नाही, ब्लॅकमेलिंग केले नाही. 7 तारखेपर्यंत कळ काढाल. एकदा मी मोकळा झालो की तुमच्यासोबत कारखान्यावर जाऊन त्यांना जाब विचारू.

राज्यात इतर ठिकाणच्या एमआयडीसी बंद पडल्या. अनेक ठिकाणी खंडणी मागण्याचे, दमदाटीचे प्रकार घडतात. बारामतीत आम्ही कोणाच्या ’पै’ला मिंधे नाहीत. बारामतीकरांसाठी सीएसआरच्या माध्यमातून मी कामे करून घेतली, परंतु उद्योगांना पोषक वातावरणही निर्माण केले. एमआयडीसी कोणी आणली, यावरही पवार यांनी भाष्य केले. बारामतीत वानखेडे नावाचे प्रांत असताना भूसंपादन कोणी केले. विमानतळाची धावपट्टी कोणी मोठी केली असा सवाल त्यांनी केला. भौगोलिक स्थिती असती तर आणखी मोठी धावपट्टी करत मोठी विमाने बारामतीत उतरवली असती, असेही ते म्हणाले. के. एम. गोयंका यांना मीच परिसर दाखवला. तदनंतर त्यांनी बारामतीत कंपनी सुरू केली. अमित कल्याणी यांना भारत फोर्जसंबंधी येणार्‍या अडचणी दूर केल्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.

आमच्या पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उद्योगपती मुकेश अंबानी, अदानी यांच्यासोबत ओळखी झाल्या आहेत ना, असे सांगून पवार म्हणाले, पूर्वी आम्ही काहीही केले तरी साहेबांमुळे झाले असे सांगून दैवताला मानायचो. ते मुख्यमंत्री असताना जरूर काही उद्योग आले. पण, त्यासाठी पोषक वातावरण मीच निर्माण केले. बारामतीत मेडिकल कॉलेज, आयुर्वेद कॉलेज कोणी उभे केले असा सवाल करून पवार म्हणाले, इच्छाशक्ती असेल तर या गोष्टी होतात. कामगारांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न महायुती सरकारनेच सोडवला. बारामतीत कामगारंसाठी सुसज्ज हॉस्पिटलची आणि त्यानंतर कामगारांसाठी वसाहत उभी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक पांडुरंग कचरे यांनी केले.

माहेरवाशिणीची पाठवणी करा

आपल्या घरात लग्न झालेली मुलगी माहेरवाशीण म्हणून चार दिवस येते. त्या चार दिवसात नणंद-भावजयीने गुण्यागोविंदाने राहायचे असते. चार दिवसानंतर मुलीला साडीचोळी, जावयाला पोषाख करून त्यांची पाठवणी करायची असते, या शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना चिमटे काढले.

हेही वाचा

 

Back to top button