LokSabha Elections | मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथाकडे : कृषिमंत्री धनंजय मुंडे | पुढारी

LokSabha Elections | मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथाकडे : कृषिमंत्री धनंजय मुंडे

बावडा : पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक गेली दहा वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहात आहेत. देशातील 140 कोटी जनता माझे कुटुंब आहे, असे मानणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. 28) केले. या सभेत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचे अनेक बाण सोडले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना धनंजय मुंडे पुढे म्हणाले, देशाची पत व प्रतिष्ठा जगामध्ये उंचावण्याचे काम मोदींनी केले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचणार आहे. कोरोना काळात देशातच लशीची निर्मिती करून जनतेच्या जीवित रक्षणाचे काम मोदींनी केले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत योजना, देशाला मोफत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी जात बघितली आहे का? आगामी काळात प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान करा, असे आवाहनदेखील धनंजय मुंडे यांनी केले. सुनेत्रा पवार या खर्‍या अर्थाने बारामतीच्या लेक आहेत. पद्मसिंह पाटील व सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील हे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून दत्तक म्हणून तेर-उस्मानाबादला गेले आहेत. लेकीच्या मतदानासाठी सून परकी आहे म्हणता, उत्तुंग नेतृत्वावर राजकारणात एवढी वाईट वेळ ही लेकीला मत मागण्यासाठी येत आहे, ते निगरगट्ट मनाचे झालेत. मतासाठी सुनेला परके म्हणता, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

सन 1978 मध्ये भाजपसोबत बनवलेले पुलोद सरकार, 2014 ला न मागता दिलेला भाजपला पाठिंबा, 2022 मध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी 53 आमदारांच्या सह्या, तसेच 2019 मध्ये शिवसेना-भाजप यांना गुण्या-गोविंदाने नांदू दिले असते तर राज्यात नंतरच्या राजकीय भानगडी झाल्याच नसत्या, याला जबाबदार कोण? असा सवाल करीत मुंडे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
या वेळी आ. दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सरपंच चित्रलेखा ढोले, श्रीमंत ढोले, नवनाथ पडळकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

…तर दोघांचीही ब्रेन मॅपिंग करा : धनंजय मुंडे

सन 2017 ला दिल्लीत अनंत चतुर्दशीदिवशी शरद पवार यांच्यासोबत लोकसभा, विधानसभेसह मंत्रिमंडळ, पालकमंत्रिपद सगळं ठरलं होतं.. का बिघडलं.. मी पुरावा द्यायला तयार आहे. मी खोटं बोलत असेल तर दोघांची ब—ेन मॅपिंग करा, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले.

पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनेच

अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सहमतीनेच झाला, हे मी जबाबदारीने बोलत आहे. यासाठी मी कुठल्याही परीक्षेला तयार आहे. मात्र यासंदर्भात दादांना खलनायक ठरविण्यात आले, असा जोरदार प्रहार धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला.

जगप्रसिद्ध संसदरत्न,आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्या

मला त्यांचे नावसुद्धा घ्यायचे नाही, असा उल्लेख करीत धनंजय मुंडे यांनी जगप्रसिद्ध संसदरत्न, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्या अशा शब्दांचा वापर करीत त्यांनी वडिलांच्या आशीर्वादाने बारामती मतदारसंघात एकही प्रकल्प उभारला नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली. या उलट सुनेत्रा पवार यांन टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून 14 हजार महिलांना काम दिल्याचे गौरवोद्गार काढले.

हेही वाचा

Back to top button