तालासुरांवरील पदन्यास अन् छम्छम्ची वाढतेय गोडी..! | पुढारी

तालासुरांवरील पदन्यास अन् छम्छम्ची वाढतेय गोडी..!

सुवर्णा चव्हाण

पुणे : अक्षयने बॉलीवूड नृत्य शिकण्यासाठी नृत्य वर्गात प्रवेश घेतला आणि बघता-बघता त्याने नृत्यात प्रावीण्य मिळविले. सध्या अक्षयप्रमाणे कित्येक शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण नृत्य शिक्षणाकडे वळले आहेत. त्यामुळेच गेल्या तीन ते चार वर्षांत पुण्यामध्ये नृत्य शिक्षण देणार्‍या संस्था आणि नृत्य वर्गांची संख्या वाढली आहे. अंदाजे सात हजारांंहून अधिक संस्था आणि नृत्य वर्ग पुण्यात असून, त्यामध्ये शास्त्रीय नृत्य प्रकार शिकविणार्‍या संस्था आणि वर्गांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात नृत्य संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजत आहे. त्यामुळेच यंदा वैविध्यपूर्ण नृत्य प्रकार शिकविणार्‍या उन्हाळी शिबिरांकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल असून, अशा नृत्य शिबिरांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.

नृत्य शिक्षणाविषयी झालेली जागृती, दूरचित्रवाणीवर नृत्यविषयक मालिकांची वाढलेली संख्या, पुण्यात निर्माण झालेले नृत्य शिक्षण विषयक वातावरण आणि नृत्य दिग्दर्शकांची वाढलेली संख्या…अशा विविध कारणांमुळे पुण्यात नृत्य शिकवणार्‍या संस्था आणि नृत्य वर्ग वाढले आहेत. फक्त शास्त्रीय नृत्यच नव्हे, तर पाश्चिमात्य आणि लोकनृत्याचे शिक्षण देणार्‍या संस्थांचीही संख्या आता वाढत आहे. आता ग्रामीण भागातही नृत्य वर्ग वाढले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात नृत्य शिकविणे हे व्यवसायाचा एक भाग बनल्याने पुण्यात नृत्यदिग्दर्शकांचा कलही नृत्य वर्ग घेण्याकडे अधिक आहे. म्हणूनच पुण्यामध्ये मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, औंध आदी भागांमध्ये नृत्य संस्था आणि वर्ग वाढले आहेत. सोमवारी (दि.29) होणार्‍या जागतिक नृत्य दिनानिमित्त दै. पुढारीने घेतलेला हा आढावा.

नृत्य परिषदेचे कार्याध्यक्ष जतीन पांडे म्हणाले, पुण्यात नृत्यविषयक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यात नृत्य दिग्दर्शकांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे नृत्य शिक्षण देणार्‍या संस्था आणि वर्गांचीही संख्या वाढली आहे. पुण्यात नृत्य शिकविणार्‍या नृत्य दिग्दर्शकांचे सरासरी वय 18 ते 50 एवढे असून, त्यातील काही जण पाश्चिमात्य नृत्य शिकविण्यावर भर देत आहेत. बॉलीवूड असो वा लोकनृत्य…असे नृत्य प्रकार ज्येष्ठ नागरिकांसह नोकरदार महिला आणि गृहिणी शिकत असतील हे ऐकून आश्चर्य वाटेल…हे खरंय…आता ज्येष्ठांसह नोकरदार महिला आणि गृहिणीही फिटनेससाठी नृत्य शिक्षणाकडे वळल्या असून, नृत्य दिग्दर्शकांकडून विशेष वर्ग आयोजित केले जात आहेत.

सोशल मीडियावर गाजताहेत नृत्याचे व्हिडीओ

काही तरुण-तरुणी सोशल मीडियावर आपल्या नृत्याद्वारे प्रसिद्धी मिळवित आहेत. काही नृत्यदिग्दर्शक तरुण-तरुणी सोशल मीडियाद्वारे लोकांना घरबसल्या नृत्य शिकवण्यासाठी यू-ट्यूब चॅनेलवर नृत्यवर्ग घेत आहेत. तर काही जणी विविध गाण्यांवर पाश्चात्त्य नृत्य रील्स आणि व्हिडीओ बनवून पोस्ट करीत नृत्याच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत आहेत.

हे नृृत्यप्रकार शिकण्याकडे कल

कथक, भरतनाट्यमसह विविध शास्त्रीय नृत्य प्रकार, लोकनृत्य, कंटेम्पररी, हिपपॉप, बेली डान्स, साल्सा, ब—ेक डान्स, बी-बोईंग, लिरिकल, जॅझ, टॅप डान्स, रॉक अँड रोल, डिस्को, लॉकिंग अँड पॉपिंग आदी.

हेही वाचा

Back to top button