कुणी पाणी देता का पाणी? लोहगावातील नागरिकांचा टाहो! | पुढारी

कुणी पाणी देता का पाणी? लोहगावातील नागरिकांचा टाहो!

संतोष निंबाळकर

धानोरी : महापालिकेत समाविष्ट होऊन सात वर्षे झाल्यानंतरही लोहगावकर पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. पाण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सुमारे तीन हजार रुपये खर्च करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाढत्या उन्हामुळे परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ‘कुणी पाणी देता का पाणी..?’ असा टाहो लोहगावकरांनी फोडला आहे.
परिसरातील सोसायट्यांना टँकरच्या पाण्यासाठी महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. लोहगावकरांचा पाण्यासाठी होणारा खर्च मिळकत कराच्या दुप्पट ते तिप्पट आहे. सुमारे 282 कोटींची लोहगाव – वाघोली पाणी योजना मंजूर झाली असली, तरी ती पूर्ण होण्यासाठी सुमारे तीस महिन्यांचा कालावधी लागणार आहेत. लोहगाव गावठाण परिसरात दिवसाआड, संतनगर भागात आठवड्यातून दोनदा, तर योजनानगर भागात सहा- सात दिवसांनी तासभर पाणी येते. खंडोबामाळ, पोरवाल रस्ता, पठारे वस्तीचा काही भाग, हरणतळे वस्ती, पवार वस्ती, माळवाडी व  वाघोली रस्त्यावरील बहुतांशी भागात अद्याप जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिक टँकरचे पाणी घरगुती फिल्टरने शुद्ध करून पिण्यासाठी वापरतात. परंतु, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पंधरा ते वीस कोटींची वार्षिक उलाढाल

लोहगाव परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या स्वतःच्या विहिरी किंवा कूपनलिका आहेत. त्यातील पाण्याचा वापर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो.  दहा हजार लिटरच्या टँकरसाठी आठशे ते बाराशे रुपये आकारले जातात. तर वीस लिटर आरओ पाण्यासाठी दहा रुपये आकारले जातात. लोहगावची अंदाजे लोकसंख्या अडीच लाख आहे. त्यामुळे टँकर व आरओ प्लांटची सुमारे पंधरा ते वीस कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले.

सर्वसामान्य पंपिंग स्टेशनवर अवलंबून

लोहगावच्या पंपिंग स्टेशनबाहेर एक सार्वजनिक नळकोंडाळे आहे, ते चोवीस तास सुरू असते. दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून नागरिक पिण्याचे पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येतात. मोलमजुरी करणार्‍या नागरिकांना विकतचे पाणी परवडत नाही. त्यामुळे त्यांना पंपिंग स्टेशनचा मोठा आधार आहे. पाण्यासाठी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकही पाणी भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पाणी वितरणासाठी जलवाहिन्यांची मागणी केलेली असून तीन आठवड्यांत त्या वाहिन्या येतील. लोहगाव व वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी वीस ते चाळीस लाख लिटर क्षमतेच्या एकूण तेरा टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातील सात टाक्या लोहगाव येथे बांधण्यात येणार आहेत. पाण्याची मागणी करणा-या नागरिकांना टँकरने पाणी पुरविताना समस्या निर्माण होत आहेत.
– सुधीर अलुरकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग
पिण्याचे पाणी तीन ते चार दिवसांनी येते. बोअरचे पाणी कमी झाले आहे. महिन्याला चार-पाच टँकर मागवावे लागतात. पिण्यासाठी पंपिंग स्टेशनवरून पाणी नेतो.
-जगदीशसिंग राजपुरोहित, रहिवासी, लोहगाव
आम्ही आठ वर्षांपासून लोहगाव येथे राहतो. महिन्याला दोन टँकर मागवावे लागतात. पिण्यासाठी वीस लिटरचे जार विकत आणतो. यामुळे पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
-शेखर कोलूर, रहिवासी-वृंदावन पार्क, लोहगाव.
हेही वाचा

Back to top button