‘कात्रज’चे सौंदर्य खुलणार ! जलचर पक्ष्यांसाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय उभारणार नैसर्गिक अधिवास | पुढारी

‘कात्रज’चे सौंदर्य खुलणार ! जलचर पक्ष्यांसाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय उभारणार नैसर्गिक अधिवास

प्रसाद जगताप

पुणे : नद्या, तलाव, धरणाचे बॅक वॉटर या पाण्याच्या स्रोतांशेजारी असलेले फ्लोमिंगो, पेलिकन, राजहंस, विविध प्रजातीची बदके, बगळे पुणेकरांना आता कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाहायला मिळणार आहेत. याकरिता प्राणिसंग्रहालय प्रशासन या जलचर पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी तलावालगत नैसर्गिक अधिवास आणि पक्षीगृहे उभारणार आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सुमारे 130 एकर जागेत पसरलेले आहे. त्यापैकी यातच जवळपास 30 एकर जागेत ऐतिहासिक तलाव आहे. याच तलावाच्या शेजारी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने सुशोभीकरण करून नैसर्गिक जलचरांना येथे वास्तव्य करण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात मोर, गिधाड, गरूड यांच्या व्यतिरिक्त एकही वेगळा पक्षी नाही. पुणेकरांनादेखील अशाप्रकारचे पक्षी पाहाता यावेत, यासाठी प्रशासनाकडून जलचर पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास आणि पक्षीगृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला देण्यात आला आहे.

पक्षीतज्ज्ञ, अभ्यासक, वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी पर्वणी

डौलदार लांब मान, निमुळत्या शरीराचा राजहंस, उंच लांब पाय असलेला रोहित (फ्लेमिंगो) व मोठी चोच अन् पिशवीसारखा गळा असलेला पेलिकन असे पक्षीही विहार करताना टिपणे, त्याचा अभ्यास करणे पक्षीतज्ज्ञांसाठी पर्वणी ठरते. सध्या विविध प्रजातीची बदके, बगळे यांसारख्या दुर्मीळ जलचर पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी आणि अभ्यासासाठी त्यांना पुण्याबाहेर उजनी, भिगवण यांसह विविध राज्यातील नद्या, अभयारण्यात जावे लागते. मात्र, आता हे सर्व पक्षी आगामी काळात कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावाशेजारीच पाहायला मिळतील.

पक्षीगृह उभारण्याचे नियोजन

प्राणिसंग्रहालयात सध्या फारच कमी पक्षी आहेत. त्यामुळे दुर्मीळ प्रकारचे पक्षी संग्रहालयात असावे, अशी अपेक्षा पुणेकरांना आहे. त्यामुळे तलावाशेजारी जलचर आणि दुर्मीळ पक्ष्यांसाठी पक्षीगृहे उभारली जाणार आहेत. याकरिता तलावाशेजारी वॉक उभारण्याचे नियोजन असून, याकरिता अंदाजे 4 ते 5 कोटींपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे. तारांच्या जाळीचे आवरण केले जाईल. त्यामुळे पक्षी मुक्तपणे विहार करू शकतील आणि परत अधिवासात परत येतील. पक्ष्यांचे हे सौंदर्य पर्यटकांना पाहता यावे यासाठी काही भागात काचेची भिंत उभारण्याचाही मानस आहे.

10 प्रजातीचे 88 पक्षी आणणार

पक्षीगृहातील जलचर निवासस्थानात अंदाजे 10 प्रजातीचे 88 पक्षी असणार आहेत. या प्रजाती पाण्यावर घरटी बांधून राहतील. तलावाच्या किनार्‍यावर या प्रजातींसाठी बंदिस्त अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात येणार आहे. या योजनेत 9317 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या तलावाच्या काठावर एक ’जलचर एविफौना वॉक-इन-पक्षीगृह’ तयार करण्याची प्राणिसंग्रहालय प्रशासनाची कल्पना आहे.

अभ्यासकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

प्रस्तावित क्षेत्र काही प्रमाणात पाण्याच्या आत आणि अंशत: किनार्‍यालगत विकसित केले जाईल. पक्षी अभ्यासकांना या वास्तूतून ये-जा करण्यासाठी एक स्वतंत्र असे उंच व्यासपीठ करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा

 

Back to top button