नवजात बालकांची विक्री डॉक्टरसह सातजणांची टोळी पकडली | पुढारी

नवजात बालकांची विक्री डॉक्टरसह सातजणांची टोळी पकडली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरोगसीच्या माध्यमातून नवजात बालकांच्या विक्रीप्रकरणी 7 जणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यात एका डॉक्टरसह चार महिलांचा समावेश आहे. नवजात बालकांची विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून, या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाच दिवस ते नऊ वयोगटातील 14 मुलांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. डॉ. संजय सोपानराव खंदारे, वंदना अमित पवार, शीतल गणेश वारे, स्नेहा युवराज सूर्यवंशी, नसीमा हनीफ खान, लता नानाभाऊ सुरवाडे आणि शरद मारुती देवर अशी या 7 जणांची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर गोवंडी येथून शीतल वारे या महिलेस ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीत तिने रत्नागिरीच्या एका जोडप्यासह लिलेंद्र शेट्टी यांना दोन मुलांची अनुक्रमे दोन आणि अडीच लाखांमध्ये विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यासाठी तिला डॉ. संजय खंदारे, स्नेहा सूर्यवंशी व अन्य आरोपींनी मदत केली होती. या माहितीनंतर पोलिसांनी विक्रोळी पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. शीतलला अटक केल्यानंतर पोलिसांनी डॉ. संजय खदारे याच्यासह इतर चौघांनाही वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.

या आरोपींनी विक्री केलेल्या दोन्ही मुलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांना महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. संबंधित आरोपी फर्टिलिटी एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांचा विविध हॉस्पिटलशी संपर्क येतो. यावेळी हॉस्पिटलमध्ये येणार्‍या कुटुंबांसह त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नवजात बालकांची विक्री करून आर्थिक फायदा करून घेत होते. या टोळीने विकलेल्या बालकांमध्ये 11 मुले आणि 3 मुलींचा समावेश आहे. यापैकी दोन मुलांची सुटका करण्यात आली आहे.

डॉ. खंदारे मूळचा नांदेडचा

यातील डॉ. संजय खंदारे हा मूळचा नांदेडचा असून, तो सध्या दिवा येथे राहतो. त्याचे एक खासगी क्लिनिक आहे. ही टोळी सरोगसीसाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते. नसीमाला सरोगसीसाठी तयार करून त्यांनी तिला दहा हजार रुपये दिले होते. तिची घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तिने सरोगसीचा निर्णय घेतला होता. ज्या महिला सरोगसीसाठी इच्छुक आहेत, त्यांना ठाण्यातील दोन रुग्णालयात नेले जात होते. त्यामुळे ठाण्यातील दोन रुग्णालये गुन्हे शाखेच्या रडार असल्याचे बोलले जाते. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Back to top button