बेकायदेशीर 42 पिस्तुले; 74 जिवंत काडतुसे जप्त : पोलिसांची संयुक्तिक कामगिरी | पुढारी

बेकायदेशीर 42 पिस्तुले; 74 जिवंत काडतुसे जप्त : पोलिसांची संयुक्तिक कामगिरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या झाडाझडतीमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 42 बेकादेशीर पिस्तुले, तर 74 जिवंत काडतुसे जप्त करताना 28 पिस्तुले बाळगणार्‍यांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिस आयुक्तांनी पिस्तूल बाळगणार्‍या सराइतांची मागील काही दिवसांपूर्वी परेड घेतली होती. शहरात गोळीबाराच्या घटना घडू नयेत, यादृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु, गेल्या आठवड्यात सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून रेकॉर्डवरील तसेच ज्यांच्याकडे पिस्तूल असल्याचा संशय आहे अशांचा शोध घेतला जात होता. महिनाभरापासून गुन्हे शाखेची विविध पथके अशा आरोपींच्या मागावर होती. गुन्हे शाखेने यामध्ये 28 पिस्तुले व 54 काडतुसे जमा केली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील पथकांनी 14 पिस्तुले आणि 20 काडतुसे जप्त केली. ही कारवाई सुरू असतानाच चॉकलेट सुन्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या नवनाथ वाडकर आणि बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराच्या प्रकरणात सहभागी व हल्लेखोरांनाही आता बेड्या ठोकण्यात आल्या.

कारवाई सुरूच राहणार

जप्त केलेली पिस्तुले 13 लाख रुपये किमतीची आहेत. आर्म अ‍ॅक्ट आणि शस्त्रचा वापर स्ट्रीट क्राइममध्ये करण्यात येत आहे. हे थांबविणे पोलिसांची प्राथमिकता आहे. यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील, प्रयत्नातील, एमपीडीए, तडीपार, आर्म अ‍ॅक्ट, मोक्कासारख्या गुन्ह्यांतील आरोपी जामिनावर बाहेर आले असतील. या सगळ्या आरोपींविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. गुन्हेगारांवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांना गुन्हेगार त्रास देत असेल, तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. तसेच, यापुढील काळात देखील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button