नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली | पुढारी

नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  काल भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत प्रितम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेल, त्यांची काळजी करु नका असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला आहे.

भुजबळ म्हणाले, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत, असे नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. भुजबळ पुढे म्हणाले, नाशिकमध्ये आमच्याकडे  वंजारी समाजाचे हेमंत धात्रक, बाळासाहेब सानप, उदय सांगळे सारखे लोक आहेत.
त्यामुळे तुम्ही बीड मध्ये जास्त लक्ष केंद्रित करा, कुठल्याही परिस्थितीत निवडुन या. ती गरज आहे.

नाशिकमध्ये भुजबळांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतील असली तरी पक्षाचा जागेवरील दावा कायम ठेवला आहे. भुजबळांनी ही निवडणूक लढवावी असा दबाव ओबीसी समाज व समता परिषदेकडून होत आहे. दुसरीकडे, घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना शिंदे गट यांचाही या मतदारसंघावर दावा आहे.  त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या जागेवरुन असे विधान केल्याने भुजबळांनी त्याचा समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे

भाजपने बीडमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. अशात प्रितम मुंडे यांचे काय ? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत असताना. प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही असा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

Back to top button