राज्यात 109 लाख टन साखरेचे उत्पादनच; ऊसगाळप हंगाम संपण्याची अपेक्षा | पुढारी

राज्यात 109 लाख टन साखरेचे उत्पादनच; ऊसगाळप हंगाम संपण्याची अपेक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदाच्या 2023-24 मधील ऊसगाळप हंगामात साखरेचे 109 लाख 67 हजार टनाइतके उत्पादन हाती आलेले आहे. सद्यस्थितीत ऊस संपल्याने 200 साखर कारखाने बंद झाले असून, अद्यापही 7 कारखान्यांची धुराडी सुरू आहेत. त्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळपही एप्रिल महिनाअखेरपर्यंत पूर्ण होऊन आठवडाभरात हंगाम संपण्याची अपेक्षा असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. राज्यात 103 सहकारी आणि 104 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतलेला आहे. त्यांनी 10 कोटी 69 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून 10.26 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 109.67 लाख टन साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

गतवर्षीचा म्हणजे 2022-23 या हंगामात 23 एप्रिलअखेर सर्व 211 साखर कारखान्यांचा हंगाम संपला होता. त्यांनी 10 कोटी 53 लाख टन उसाचे गाळप पूर्ण करीत 10 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 105.23 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन तयार केले होते. याचा विचार करता चालूवर्षी सुमारे साडेचार लाख टनांनी साखरेचे अधिक उत्पादन तयार झालेले असून, उताराही किंचित वाढला आहे. साखर उतार्‍याची विभागनिहाय स्थिती पाहता कोल्हापूर 11.59 टक्के, पुणे 10.52 टक्के, सोलापूर 9.39 टक्के, अहमदनगर 9.97 टक्के, छत्रपती संभाजीनगर 8.95 टक्के, नांदेड 10.25 टक्के, अमरावती 9.42 टक्के, नागपूर 6.6 टक्के उतारा मिळालेला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातपैकी 4 कारखाने पुणे, नगर जिल्ह्यातील…

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्रीसोमेश्वर सहकारी, जुन्नरमधील श्रीविघ्नहर सहकारी, सोलापूरमधील श्रीसिध्देश्वर सहकारी (कुमठे,उत्तर सोलापूर), अहमदनगरमधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी, नागपूर जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर (बेला,उमरेड) आणि भंडारा जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर (देव्हाडा-मोहाडी,भंडारा) असे 7 साखर कारखाने सुरू आहेत.

हेही वाचा

Back to top button