साखर कारखान्यांना दिलासा : बी-हेवी मोलँसिसपासून इथेनॉल बनविण्यास केंद्राची मंजुरी | पुढारी

साखर कारखान्यांना दिलासा : बी-हेवी मोलँसिसपासून इथेनॉल बनविण्यास केंद्राची मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या 6.7 लाख टन बी हेवी मोलँयसिसचे इथेनॉल मध्ये रूपांतर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशातील साखरेचे उत्पादन कमी होईल या भीतीने ७ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने बी हेवी मोलाइसिस पासून इथेनॉल बनविण्यास बंदी घातली होती तेव्हापासून हा साठा साखर कारखान्यांकडे पडून होता, यापासून इथेनॉल बनविण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पाठविला होता या प्रस्तावावर विचार केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारने बंदी घातल्यापासून या बी हेवी मोलँसिसचा साठा साखर कारखान्यांकडे पडून होता. हे बी-हेवी मोलँसिस स्फोटक असल्याने ते साठवणेही घातकही होते ,त्यामुळे एका बाजूला कारखान्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच हा घातक साठा साठवून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत होती. या दुहेरी संकटातून साखर कारखान्यांना सोडविण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारला या साठ्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव दिला होता. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आता साखर कारखान्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार असून त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे वेळेवर देणे ही साखर कारखान्यांना शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशभरातील साखर उद्योगाला आणि उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, त्याबद्दल पंतप्रधानांचे तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे मनापासून आभारी आहोत असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button